एण्टरटेन्मेंट.. एण्टरटेन्मेंट.. एण्टरटेन्मेंट.. हा आयपीएलचा फंडा. ख्रिस गेल, ए बी डी’व्हिलियर्स, सुरेश रैना, गौतम गंभीर, युवराज सिंग यासारख्या आतिषी फलंदाजांची मुक्तहस्ते धावांची लयलूट असो किंवा मॉर्नी मॉर्केल, सुनील नरिन, आर. अश्विन, लसिथ मलिंगा, हरमीत सिंग यांची फलंदाजांना जखडून ठेवणारी अथवा हमखास बळी मिळवणारी गोलंदाजी असो. याशिवाय चीअरलीडर्सची अदाकारी, सेलिब्रेटी वा मालकांचे नाटय़रंग, वादविवादांचे गुऱ्हाळ हे सारे तर आयपीएलसाठी परवलीचेच. आता ५४ दिवस ९ संघांमधील ७६ सामन्यांचा मैदानावरील थरार क्रिकेटरसिकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी येतोय. सहाव्या पर्वाला सामोरे जाणाऱ्या या महोत्सवातील संघांचा घेतलेला हा वेध –
चेन्नई सुपर किंग्ज : आयपीएलमधील महासत्ता
बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या मालकीचा आणि भारताचा यशस्वी संघनायक महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली आपली यशोगाथा कायम राखणारा चेन्नई सुपर किंग्जचा संघ ‘आयपीएलमधील महासत्ता’ म्हणून ओळखला जातो. आतापर्यंतच्या पाचपैकी चार स्पर्धामध्ये अंतिम फेरी गाठणाऱ्या या संघाच्या खात्यावर दोन विजेतेपदे आणि दोन उपविजेतेपदे जमा आहेत. गतवर्षी त्यांचे हॅट्ट्रिक साधण्याचे स्वप्न कोलकाता नाइट रायडर्सने चेपॉकवर उधळून लावले. नशीब हा फार मोठा घटक चेन्नईच्या पाठीशी असतो, अन्यथा गतवर्षी ते बाद फेरीत पोहोचूच शकले नसते.
महत्त्वाचे खेळाडू : महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, आर. अश्विन, मुरली विजय, रवींद्र जडेजा, मायकेल हसी, डर्क नेन्स.

मुंबई इंडियन्स : दुनिया हिला देंगे?
‘दुनिया हिला देंगे’ हा मंत्र जपणारा संघ प्रत्यक्षात हा करिष्मा मैदानावर दाखवू शकलेला नाही. यंदा मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर, कप्तान रिकी पाँटिंग, मुख्य मार्गदर्शक अनिल कुंबळे, प्रशिक्षक जॉन राइट अशी जबरदस्त ‘थिंक टँक’ त्यांच्या दिमतीला आहे. २०११ची चॅम्पियन्स लीग जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सने आयपीएलचे जेतेपद अद्याप साकारलेले नाही. यंदा मालकीण नीता अंबानी यांनी ग्लेन मॅक्सवेल हा वेगवान क्रिकेटचा नवा चेहरा संघाला मिळवून दिला आहे. अंबाती रायुडू, रोहित शर्मा, किरॉन पोलार्ड, लसिथ मलिंगा यांसारख्या अव्वल खेळाडूंचा समावेश असलेल्या या संघाकडूनच्या अपेक्षा यंदा वाढल्या आहेत.
महत्त्वाचे खेळाडू : सचिन तेंडुलकर, रिकी पाँटिंग, ग्लेन मॅक्सवेल, लसिथ मलिंगा, रोहित शर्मा, किरॉन पोलार्ड.

दिल्ली डेअरडेव्हिस : बेभरवशाचा संघ
दिल्ली डेअरडेव्हिल्स हा संघ नेहमीच आपल्या नावाला जागतो. वीरेंद्र सेहवाग, डेव्हिड वॉर्नर, केव्हिन पीटरसन यांसारखे धडाकेबाज खेळाडू संघात असतानाही ‘बेभरवशाचा संघ’ ही आपली ओळख तो जपतो. मॉर्नी मॉर्केल, उमेश यादव आणि वरुण आरोन असा वेगवान मारा त्यांच्याकडे आहे. परंतु या हंगामात पीटरसन आणि जेसी रायडर नसल्यामुळे आणि वीरू धावांसाठी झगडत असल्यामुळे आधीच त्यांचे धाबे दणाणले आहेत. यंदा वीरूऐवजी नेतृत्वाची धुरा महेला जयवर्धनेकडे सोपविण्यात आली आहे. पाहूया यंदा नवी बांधणी संघाला किती प्रेरक ठरते ते!
महत्त्वाचे खेळाडू : वीरेंद्र सेहवाग, महेला जयवर्धने, मॉर्नी मॉर्केल, डेव्हिड वॉर्नर, जोहान बोथा, उन्मुक्त चंद.

पुणे वॉरियर्स : अनिश्चितता संपेल?
अनिश्चितता हे सहारा पुणे वॉरियर्स संघाचे प्रमुख वैशिष्टय़. २०११मध्ये पुण्याच्या संघाला हक्काचे स्टेडियम नसल्यामुळे डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर त्यांनी आयपीएलचा श्रीगणेशा केला. युवराज सिंगच्या ऐवजी बदली खेळाडू नाकारल्यामुळे बीसीसीआयशी पंगा घेतल्याने गतवर्षी पुण्याने स्पध्रेतून माघार घेण्याची धमकी दिली होती. परंतु सुदैवाने वादावर तोडगा निघाला आणि संघाचे अस्तित्व टिकले. यंदा कर्णधाराचा शोध ही त्यांची प्रमुख डोकेदुखी ठरली. सौरव गांगुलीने संघ सोडला असताना लिलावामधून पुण्याने मायकेल क्लार्कला खरेदी केले. परंतु पाठदुखीमुळे क्लार्कने आयपीएलमधून माघार घेतली आहे. अखेर अँजेलो मॅथ्यूजच्या माथ्यावर संघानायकाचा मुकुट घालण्यात आला आहे.
महत्त्वाचे खेळाडू : अँजेलो मॅथ्यूज, अभिषेक नायर, अजंठा मेंडिस, ईश्वर पांडे, स्टीव्हन स्मिथ, युवराज सिंग, रॉस टेलर.

सनरायजर्स हैदराबाद : नवा संघ, नव्या आशा
डेक्कन चार्जर्सवर हकालपट्टीची कारवाई झाल्यानंतर या हंगामात सनरायजर्स हैदराबाद या नव्या संघाची नांदी होत आहे. कुमार संगकारा आणि डेल स्टेन हे डेक्कनचे आधारस्तंभ सनरायजर्सकडेच कायम राहिल्यामुळे जुनी दारू नव्या बाटलीत भरल्याप्रमाणे या संघाची स्थिती होऊ नये. १६ स्थानिक आणि १० आंतरराष्ट्रीय अशा २६ खेळाडूंनिशी सनरायजर्सने यंदा आपली मोट बांधली आहे. टॉम मुडी, के. श्रीकांत, व्हीव्हीएस लक्ष्मण, वकार युनूस आदी दिग्गज क्रिकेटपटू संघाला मार्गदर्शन करीत आहेत. या पाश्र्वभूमी सनरायजर्सचा उदय कसा होणार, याची क्रिकेटरसिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.
महत्त्वाचे खेळाडू : कुमार संगकारा, डेल स्टेन, इशांत शर्मा, शिखर धवन, कॅमेरून व्हाइट, डॅरेन सामी, थिसारा परेरा.

कोलकाता नाइट रायडर्स : लोरबो, कोरबो, जीतबो रे!
वाद आणि कोलकाता नाइट रायडर्स हे मागील पाच हंगाम हातात हात घालूनच वावरत आहे. सिनेअभिनेता शाहरुख खान या प्रत्येक वादात प्रमुख भूमिकेत ओघानेच आहे. कोलकात्याशी भावनिक नाते जपणाऱ्या या संघाचे प्रारंभीचे तीन हंगाम सौरव गांगुली-शाहरुख वादामुळे गाजले. गांगुलीशी कोलकाता नाइट रायडर्सचा काडीमोड झाल्यानंतर काही काळ कोलकातावासीयांना ही गोष्ट सलत होती. पण त्यानंतर हा संघ खऱ्या अर्थाने मैदानावर वावरू लागला. चौथ्या हंगामात कोलकात्याचा संघ प्ले-ऑफ खेळला. मग पाचव्या हंगामात शाहरुखने वानखेडेवर महानाटय़ सादर केले, परंतु गौतम गंभीरच्या नेतृत्वाने कोलकात्याचे नशीब पालटले. चेपॉकवर धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जला धक्का देत कोलकात्याचा संघ विजेता ठरला.
महत्त्वाचे खेळाडू : गौतम गंभीर, जॅक कॅलिस, एल. बालाजी, ब्रेट ली, मनोज तिवारी, युसूफ पठाण, ईऑन मॉर्गन, शाकिब अल हसन, जेम्स पॅटिन्सन.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : गेल नावाचा झंझावात
मल्ल्या यांच्या मालकीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे उड्डाण मात्र झोकात सुरू आहे. ख्रिस गेल नावाचा झंझावात आयपीएलच्या मागील अनेक हंगामांमध्ये आपले अधिराज्य गाजवत आहे. गेलच्या फटक्यांच्या या मुक्तछंदात्मक काव्यामुळेच बंगळुरूचा संघ लोकप्रियतेची कमान जपून आहे. सोबतीला विराट कोहली आणि तिलकरत्ने दिलशान हे धडाकेबाज फलंदाज आहेत. झहीर खान आणि रवी रामपॉल दुखापतीतून सावरल्यामुळे संघाची ताकद आणखीन वाढली आहे. फिरकीचा बादशाह मुथय्या मुरली, डॅनियल व्हेटोरी यांसारखे अनुभवी आणि सौरभ तिवारी, विजय झोल यांसारखे नवे तारे असा जुन्या-नव्याचा सुरेख संगम या संघात पाहायला मिळतो. कागदावर आणि मैदानावर बळकट असणारा हा संघ अद्याप आयपीएल जेतेपदापासून वंचित राहिला आहे.
महत्त्वाचे खेळाडू : ख्रिस गेल, विराट कोहली, तिलकरत्ने दिलशान, ए बी डी’व्हिलियर्स, डॅनियल व्हेटोरी, मुथय्या मुरलीधरन.

राजस्थान रॉयल्स : जेतेपद स्वप्नवतच
आयपीएलच्या पहिल्या हंगामात राजस्थान रॉयल्सकडून सर्वाच्याच फार माफक अपेक्षा होत्या. परंतु त्या संघाने आश्चर्यकारक विजेतेपद प्राप्त करून सर्वानाच थक्क केले होते. आता सहाव्या हंगामाला सामोरे जाताना आयपीएलच्या पहिल्या जेतेपदाच्या त्या आठवणी अधिक धुसर झाल्या आहेत आणि आगामी जेतेपद स्वप्नवत वाटू लागले आहे. शेन वॉर्नकडून नेतृत्वाची मशाल राहुल द्रविडकडे आल्यानंतरही संघाचा रुबाब तसाच आहे. मागील हंगामात अजिंक्य रहाणेने धुवाधार फटकेबाजी करीत राजस्थानला चांगली सलामी नोंदवण्यात सिंहाचा वाटा उचलला. पण तरीही युवा आणि अपरिचित खेळाडूंचा भरणा असलेल्या या संघाची मजल मर्यादित राहिली.
महत्त्वाचे खेळाडू : राहुल द्रविड, शेन वॉटसन, अजिंक्य रहाणे, केव्हिन कुपर, फिडेल एडवर्ड, सॅम्युएल बद्री.

किंग्ज इलेव्हन पंजाब : गिल्ली का जादू चलेगा क्या?
कोणत्याही आक्रमणावर हल्लाबोल करण्याची क्षमता कर्णधार अ‍ॅडम गिलख्रिस्टकडे आहे. परंतु ही जादू अजून टिकून आहे का, हे मात्र मैदानावरच सिद्ध होईल. कप्तान गिलख्रिस्ट आणि प्रशिक्षक डॅरेल लेहमन या ऑस्ट्रेलियन जोडगोळीने २००९मध्ये डेक्कन चार्जर्सला दुसरे आयपीएल जेतेपद जिंकून दिले होते. हीच यशस्वी ऑसी जोडगोळी यशाची करामत पंजाबसाठी करून दाखवेल का, ही सर्वानाच उत्कंठा आहे. २००८च्या पहिल्या आयपीएल हंगामात पंजाबच्या संघाने उपांत्य फेरीपर्यंत आलेख उंचावला होता. परंतु त्यानंतर प्रीती झिंटाच्या मालकीचा हा संघ यशासाठी झगडतानाच आढळला. गतवर्षी हा संघ सहाव्या क्रमांकावर फेकला गेला.
महत्त्वाचे खेळाडू : अ‍ॅडम गिलख्रिस्ट, अझर मेहमूद, शॉन मार्श, मनदीप सिंग, डेव्हिड हसी, पॉल व्हल्थाटी.
वर्ष     ऑरेंज कॅप विजेते          पर्पल कॅप विजेते
२००८    शॉन मार्श (६१६ धावा)    सोहेल तन्वीर (२२ बळी)
२००९    मॅथ्यू हेडन (५७२ धावा)    आर. पी. सिंग (२३ बळी)
२०१०    सचिन तेंडुलकर (६१८ धावा)    प्रग्यान ओझा (२१ बळी)
२०११    ख्रिस गेल (६०८ धावा)    लसिथ मलिंगा (२८ बळी)
२०१२    ख्रिस गेल (७३३ धावा)    मॉर्नी मॉर्केल (२५ बळी)