दुबईच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबई इंडियन्सवर सुपर ओव्हरमध्ये मात केली. दोन्ही संघांनी निर्धारित वेळेत २०१ धावा केल्या. सामना बरोबरीत सुटल्यामुळे सामन्याचा निकाल सुपर ओव्हरवर लावण्यात आला. मुंबईने सुपर ओव्हरमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना फक्त ७ धावा केल्या. बंगळुरूकडून डीव्हिलियर्स आणि विराटने ८ धावांचे आव्हान पार करत विजय मिळवला.

या सामन्यात इशान किशन या नव्या दमाच्या फलंदाजाने तुफान फटकेबाजी केली. सामना मुंबईच्या हातून निसटतो की काय असं वाटत असताना इशान किशन आणि पोलार्ड या दोघांनी सामना खेचला. इशान किशनने तब्बल ९ षटकार लगावत ५८ चेंडूत ९९ धावा केल्या. शेवटच्या षटकात २ चेंडूत ५ धावा हव्या असताना तो झेलबाद झाला. त्यामुळे तो काहीसा नाराज झाला होता. त्यानंतर सुपर ओव्हरमध्येही त्याला संधी मिळाली नाही आणि मुंबईने सामना गमावला. त्यानंतर इशान किशन एकटाच डगआऊटमध्ये खुर्च्यांचा आधार घेऊन जमिनीवर बसला होता. त्याचा तो फोटो प्रचंड व्हायरल झाला. नेटकऱ्यांनी त्याचा तो फोटो पोस्ट करत त्याला धीर दिला आणि त्याच्या खेळीचं कौतुक केलं.

याशिवाय, काहींनी इशान किशन पराभवानंतर हताश झालेला फोटो ट्विट करत त्याला धीर दिला.

असा रंगला सामना-

रोहित शर्माने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतल्यावर सलामीवीर फिंच आणि पडीकल फलंदाजीस आले. दोघांनी अर्धशतकं ठोकत बंगळुरूला चांगली सलामी मिळवून दिली. फिंच (५२) आणि पडीकल (५४) बाद झाल्यावर लगेच विराटही ३ धावांवर माघारी परतला. त्यानंतर एबी डिव्हीलियर्स आणि शिवम दुबेने फटकेबाजी केली. डीव्हिलियर्सने २४ चेंडूत ५५ धावा केल्या तर शिवम दुबेने १० चेंडूत २७ धावा केल्या. त्यांच्या फटकेबाजीमुळेच RCBने २०१ धावांचा टप्पा गाठला. मुंबईकडून ट्रेंट बोल्टने २ तर राहुल चहरने १ बळी घेतला.

२०२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा (८), क्विंटन डी कॉक (१४), सूर्यकुमार यादव (०) आणि हार्दिक पांड्या (१५) यांनी चाहत्यांची निराशा केली. पण इशान किशन आणि कायरन पोलार्ड यांनी शेवटपर्यंत खिंड लढवली. इशान किशन शेवटच्या षटकात ५८ चेंडूत ९९ धावा (२ चौकार, ९ षटकार) करून बाद झाला. पण पोलार्डने शेवटच्या चेंडूवर चौकार लगावत सामना सुपर ओव्हरपर्यंत खेचला. पोलार्डने २४ चेंडूत नाबाद ६० धावा (३ चौकार, ५ षटकार) केल्या. पण सुपर ओव्हरमध्ये मात्र मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला.