IPL 2025 Jasprit Bumrah Mahela Jayawardene Video: जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने २० धावांनी गुजरातचा पराभव केला. यासह मुंबई इंडियन्सचा संघ दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात खेळताना दिसणार आहे. तर स्पर्धेचे जेतेपद जिंकण्यापासून संघ दोन पाऊस दूर आहे. दरम्यान गुजरात वि. मुंबईचा सामना चांगलाच रोमांचक आणि अटीतटीचा झाला. या सामन्यादरम्यान जयवर्धने आणि बुमराह यांचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

एलिमिनेटरमध्ये मुंबईने प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्माच्या ८० धावांच्या खेळीच्या जोरावर आणि इतर फलंदाजांच्या योगदानासह २२८ धावांचे मोठे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात गुजरातला फक्त २२० धावा करता आल्या. मुंबईसाठी गुजरातवरील हा विजय अजिबात सोपा नव्हता. मुंबईला अटीतटीची लढत देत यात विजय खेचून आणावा लागला. मुंबईसाठी जसप्रीत बुमराह संकटमोचक ठरला.

जसप्रीत बुमराहच्या एका षटकाने सामन्याचा रोख बदलला. बुमराहने परफेक्ट यॉर्करने वॉशिंग्टन सुंदरचा त्रिफळा उडवला आणि संघाला मोठी विकेट मिळवून दिली. यानंतर गुजरातचा संघ लक्ष्याचा पाठलाग करताना मागे पडला. यादरम्यान संघाचे हेड कोच महेला जयवर्धने सीमारेषेजवळ बुमराहला सातत्याने काही ना काही सांगत होता, हे पाहून बुमराह वैतागला आणि त्याने शांत राहण्याचा सल्ला दिला.

वॉशिंग्टन सुंदर आणि साई सुदर्शन दोन्ही टोकावरून फटकेबाजी करत होते. ८० धावांची भागीदारी रचत येईल त्या गोलंदाजाची धुलाई करत होते. मुंबईला विकेटची नितांत गरज होती आणि अशावेळी बुमराहपेक्षा योग्य पर्याय कोणी असूच शकत नाही. दरम्यान १३ वे षटक सुरू असताना बुमराह मैदानात गोलंदाजीसाठी सज्ज होत होता.

१३ व्या षटकात जयवर्धनेने बुमराहला काही सूचना देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बुमराह सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत होता. कोचचं म्हणणं बुमराहने ऐकून घेतलं, पण सातत्याने जयवर्धने त्याला काहीतरी सांगण्याता प्रयत्न करत होता. हे पाहून बुमराह वैतागला आणि त्याने हातवारे करत थांबा थांबा म्हणत शांत रिलॅक्स राहण्यास त्यांना सांगितलं.

बुमराहने कोचला हावभावांद्वारे जे सांगितले ते समालोचक जतिन सप्रू कॉमेंट्री दरम्यान सांगण्याचा प्रयत्न करत होता. सप्रू म्हणाला, “बुमराह म्हणत आहे की मला माझं काम चांगलं माहित आहे. मी इथे आहे, कृपया शांत राहा. मला गोलंदाजीला जाऊदे तरी.” बुमराह १४ व्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आला तेव्हा हार्दिक पंड्याही त्याला बरंच काही सांगताना दिसला. तेव्हाही बुमराहने त्याला शांत राहण्याचा सल्ला दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बुमराहने गोलंदाजीला सुरूवात केली आणि चौथा चेंडू यॉर्कर टाकत सुंदरला क्लीन बोल्ड करत मुंबईला मोठी विकेट मिळवून दिली. सुंदरने २४ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांसह ४८ धावांची खेळी केली. त्याने साई सुदर्शनसह (४९ चेंडूत ८०) तिसऱ्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी केली.