Dream11 IPL 2020 MI vs RR Live Updates: राजस्थानविरूद्धच्या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकली असून मुंबईचा संघ प्रथम फलंदाजी करत आहे. मुंबईच्या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. राजस्थानच्या संघात मात्र तीन महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. अनुभवी रॉबिन उथप्पा आणि जयदेव उनाडकट यांना संघाबाहेर करण्यात आलं. जयदेव उनाडकटच्या जागी कार्तिक त्यागी या नव्या दमाच्या वेगवान गोलंदाजाला संधी देण्यात आली आणि त्याने पहिल्याच सामन्यात पराक्रम केला.

१९ वर्षाखालील वन डे विश्वचषक स्पर्धेत दमदार कामगिरी केल्याने कार्तिकला राजस्थानने विकत घेतले. कार्तिक त्यागीने १९ वर्षाखालील वन डे विश्वचषक स्पर्धेतही ६ सामन्यात ११ बळी टिपले होते. पण पहिल्या चार सामन्यात त्याला संधी मिळाली नव्हती. पहिले दोन सामने राजस्थानने जिंकले, पण नंतरच्या दोनही सामन्यात राजस्थानला पराभवाचा सामना करावा लागला. त्यात उनाडकटची कामगिरी अतिशय खराब असल्याने त्याला संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्याच्या जागी संधी मिळालेल्या कार्तिक त्यागीला Dream11 IPLमध्ये Dream Start (स्वप्नवत सुरूवात) मिळाली. त्याने पहिल्या षटकात फुल टॉस चेंडूवर रोहित शर्माचा षटकार खाल्ला. पण त्याच षटकात त्याने अनुभवी क्विंटन डी कॉकचा बळी मिळवला.

पहिल्या सामन्यात दोन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फलंदाजांना गोलंदाजी करणं खूपच दडपणाचं असतं, पण कार्तिकने डी कॉकला मोक्याच्या क्षणी बाऊन्सर चेंडू टाकला आणि त्यावर फटका मारताना डी कॉक फसला. बॅटला लागून उंच उडालेला चेंडू किपर जोस बटलरने टिपला. १५ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकार लगावणारा डी कॉक २३ धावांवर बाद झाला.