KL Rahul Record News: आयपीएल २०२५ स्पर्धेतील ६० वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. या सामन्यात गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून दिल्लीला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं आहे. दरम्यान प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्सकडून केएल राहुलने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

दिल्ली कॅपिटल्सकडून तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येणाऱ्या केएल राहुलला सलामीला फलंदाजीला येण्याची संधी मिळाली. जॅक फ्रेजर मॅकगर्क या सामन्यात नसल्यामुळे केएल राहुलने डावाची सुरूवात केली आणि गुजरातच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या सामन्यात ३३ धावा पूर्ण करताच केएल राहुलने टी-२० क्रिकेटमध्ये ८००० धावा पूर्ण करण्याचा पल्ला गाठला.

असा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच भारतीय फलंदाज

या सामन्यात फलंदाजीला येण्यापूर्वी केएल राहुलला अवघ्या ३३ धावा करायच्या होत्या. राहुलने संथ सुरूवात केली. त्यानंतर मोठे फटके मारायला सुरूवात केली. २९ धावांवर फलंदाजी करत असताना त्याने मोठा फटका मारला आणि टी-२० क्रिकेटमध्ये ८००० धावांचा पल्ला गाठला. यासह तो टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद ८००० धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. या यादीत भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली अव्वल स्थानी होता. मात्र, आता केएल राहुलने विराटला मागे सोडत अव्वल स्थान गाठलं आहे.

केएल राहुलने हा कारनामा आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील २२४ व्या डावात करून दाखवला आहे. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली या यादीत अव्वल स्थानी होता. विराटने हा कारनामा आपल्या टी-२० कारकिर्दीतील २४३ व्या डावात करून दाखवला होता. या यादीत वेस्टइंडिजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेल अव्वल स्थानी आहे. गेलने हा कारनामा आपल्या टी-२० कारकिर्दीतील २१३ व्या डावात करून दाखवला होता.

केएल राहुलची आयपीएल २०२५ स्पर्धेतील कामगिरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या हंगामात लखनऊ सुपरजायंट्स संघाकडून खेळणाऱ्या केएल राहुलला या हंगामात दिल्ली कॅपिटल्सने आपल्या संघात स्थान दिलं. या हंगामात त्याने दिल्लीसाठी खेळताना दमदार फलंदाजी केली. त्याने १० सामन्यांमध्ये ४७.६३ च्या सरासरीने ३८१ धावा केल्या आहेत. तसेच त्याच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने १४३ सामन्यांमध्ये ५०६४ धावा केल्या आहेत. यासह भारतीय संघासाठी टी-२० क्रिकेट खेळतानाही त्याने धावांचा पाऊस पाडला आहे.