kl Rahul Century: दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर केएल राहुलची बॅट चांगलीच तळपली. गुजरात टायटन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात केएल राहुल दिल्लीकडून डावाची सुरूवात करण्यासाठी मैदानात आला होता. सलामीला फलंदाजी करताना त्याने तुफानी शतक झळकावलं. या खेळीच्या बळावर दिल्लीने २० षटकांअखेर १९९ धावांचा डोंगर उभारला. यादरम्यान केएल राहुलच्या नावे एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.
आयपीएल २०२५ स्पर्धेत असा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच फलंदाज
केएल राहुलने झळकावलेलं हे शतक आयपीएल २०२५ स्पर्धेतील रेकॉर्डब्रेकिंग शतक ठरलं आहे. कारण या हंगामातील ६० सामने पूर्ण झाले आहेत. मात्र, कुठल्याही उजव्या हाताच्या फलंदाजाला शतक झळकावता आलं नव्हतं. केएल राहुलने शतक झळकावण्याआधी पाच फलंदाजांनी शतक पूर्ण केलं होतं. ज्यात प्रियांश आर्य, अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, साई सुदर्शन आणि ईशान किशनचा समावेश होता. हे चारही डावखुऱ्या हाताचे फलंदाज आहेत. कुठल्याही उजव्या हाताच्या फलंदाजाला शतक झळकावता आलं नव्हतं.
केएल राहुलने या डावात फलंदाजी करताना ६५ चेंडूत ११२ धावांची खेळी केली. याआधी केएल राहुल तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत होता. तेव्हाही तो संघासाठी बहुमूल्य धावा करत होता. जॅक फ्रेजर मॅकगर्क स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे त्याच्या जागी केएल राहुलला डावाची सुरूवात करण्याची संधी मिळाली. या संधीचा त्याने पुरेपूर फायदा घेतला.
दिल्लीने उभारला १९९ धावांचा डोंगर
या सामन्यात दिल्लीचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला होता. दिल्लीकडून डावाची सुरूवात करण्यासाठी केएल राहुल आणि फाफ डू प्लेसिसची जोडी मैदानावर आली. या जोडीला हवी तशी सुरुवात करता आली नाही. फाफ डू प्लेसिस अवघ्या ५ धावांवर माघारी परतला. त्यानंतर अभिषेक पोरेल ३० धावांवर तंबूत परतला. एका बाजूने विकेट्स जात होत्या, पण केएल राहुल खंबीरपणे उभा होता. केएल राहुलने ६५ चेंडूत ११२ धावा चोपल्या. या खेळीदरम्यान त्याने १४ चौकार आणि ४ षटकार मारले.
गुजरातचा दमदार विजय
या सामन्यात गुजरात टायटन्सला विजयासाठी २०० धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी गुजरातकडून साई सुदर्शन आणि शुबमन गिलची जोडी मैदानावर आली. ही जोडी शेवटपर्यंत टिकून राहिली. साई सुदर्शनने शतक पूर्ण केलं. तर गिलचं शतक थोडक्यात हुकलं. यासह गुजरातने हा सामना १० गडी राखून आपल्या नावावर केला.