Angkrish Raghuvanshi’s IPL Debut Half Century : आयपीएल २०२४ मधील १६वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. हा सामना राजशेखर रेड्डी एसीए व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम येथे पार पडला. या सामन्यात केकेआरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. केकेआरसाठी सलामी द्यायला आलेले सुनील नरेनने दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजीचे कंबरडे मोडले, तर दुसऱ्या बाजूला भारताचा युवा फलंदाज अंगक्रिश रघुवंशी याने आपल्या स्फोटक अर्धशतकाने आपल्या उज्ज्वल भविष्याचा पाया रचला आहे.

अंगक्रिश रघुवंशीने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध २७ चेंडूत ५ चौकार आणि ३ गगनचुंबी षटकार मारत ५४ धावांची खेळी केली आहे. त्याने आरसीबीविरुद्धच्या सामन्यात प्रभावशाली खेळाडू म्हणून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते, परंतु त्याच्या आयपीएल कारकिर्दीचा पहिला डाव दिल्लीविरुद्ध खेळला. त्यामुळे आज आपण अंगक्रिश रघुवंशी कोण आहे आणि त्याच्या क्रिकेट कारकीर्दीचा प्रवास कसा होता? जाणून घेऊया.

कोण आहे अंगक्रिश रघुवंशी?

अंगक्रिश रघुवंशीचा जन्म ५ जून २००५ रोजी झाला. त्याचे क्रिकेट कौशल्य सुधारण्यासाठी त्याने गुडगाव सोडले आणि वयाच्या ११ व्या वर्षी मुंबईत आला. आंगक्रिश हा टॉप ऑर्डरचा फलंदाज आहे आणि तो ऑफ-स्पिन गोलंदाजीही करू शकतो. अंडर-१९ क्रिकेट विश्वचषक २०२२ मध्ये त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप प्रसिद्धी मिळाली. त्या विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू अंगक्रिश होता. त्याने २०२२ च्या विश्वचषकात ६ सामने खेळून २७८ धावा केल्या होत्या.

हेही वाचा – DC vs KKR : केकेआरने रचला इतिहास! सुनील नरेनच्या वादळी खेळीच्या जोरावर दिल्लीसमोर ठेवले २७३ धावांचे लक्ष्य

अंगक्रिश रघुवंशी हा खेळाडूंच्या कुटुंबातून येतो –

अंगक्रिश रघुवंशी लहानपणापासूनच खेळाडू बनणे जवळजवळ निश्चित होते. कारण तो खेळाडूंच्या कुटुंबातून आला आहे. त्याची आई मलिका रघुवंशी यांनी बास्केटबॉलमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याचे वडील अवनीश आपल्या देशासाठी टेनिस खेळले आहेत. त्याचा भाऊ क्रिशांग रघुवंशी हा देखील वडिलांप्रमाणे टेनिस खेळतो. याशिवाय त्याचे काका भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईसाठी क्रिकेट खेळले आहेत.

गुडगावहून मुंबईला कसा पोहोचला?

अंगक्रिश रघुवंशी यांनी गुडगावमध्ये प्रशिक्षक मन्सूर अली खान यांच्या नेतृत्वाखाली क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. त्याला क्रिकेट खेळण्याची एवढी आवड होती की त्यांनी वयाच्या ११ व्या वर्षी गुडगावमधील घर सोडले आणि मुंबईला गाठले. आपल्या कौशल्यांवर काम करण्यासाठी तो मुंबईत अभिषेक नायरसोबत राहिला. यानंतर खूप मेहनत घेतल्यानंतर त्याने विजय मर्चंट १६ वर्षांखालील ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळला. २०२१ साली अंडर-१९ विनू मांकड ट्रॉफीमध्ये त्याने आपल्या स्वभावाने सर्वांची मने जिंकली. यावर्षी त्याने सीके नायडू ट्रॉफीमध्ये नऊ सामन्यांमध्ये ७६५ धावा केल्या.

हेही वाचा – IPL 2024 : मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी! सूर्यकुमार यादव झाला तंदुरुस्त, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता

भावाच्या उपचाराने तो अधिक मजबूत झाला –

अंगक्रिशचा धाकटा भाऊ कृष्णा हा टेनिसपटू आहे. कृष्णाला लहानपणी ब्लड कॅन्सर झाला होता. त्याच्या आईचे म्हणणे आहे की, ब्लड कॅन्सरचे निदान झाल्यानंतर अंगक्रिश त्याच्या लहान भावासोबत हॉस्पिटलमध्ये झोपत असे. अंगक्रिशची आई मलिका रघुवंशी यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, ती पाच वर्षे तिच्या कुटुंबासाठी संघर्षाची होती. या काळात अंगक्रिशने त्याच्या धाकट्या भावाला कधीही एकटे सोडले नाही. कृष्णाच्या उपचारादरम्यान कुटुंबाची परिस्थिती जवळून पाहिल्याने अंगक्रिश मानसिकदृष्ट्या खूपच मजबूत झाला.