Dream11 IPL 2020 UAE: सलामीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईवर ५ गडी राखून विजय मिळवला. सौरभ तिवारीच्या ४२ धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबईने चेन्नईला १६३ धावांचे आव्हान दिले होते. अंबाती रायुडू (७१) आणि फाफ डु प्लेसिस (नाबाद ५८) या दोघांच्या अर्धशतकांच्या जोरावर चेन्नईने ते आव्हान शेवटच्या षटकात पूर्ण केले.

महेंद्रसिंग धोनीने या सामन्यात एक पराक्रम केला. सामन्यात त्याने यष्टीरक्षण करताना कृणाल पांड्या आणि कायरन पोलार्ड यांचे झेल टिपले. हे दोन झेल टिपून त्याने IPL कारकिर्दीत १०० झेल पूर्ण केले. IPLमध्ये १०० झेल घेणारा धोनी तिसरा खेळाडू ठरला. या यादीत कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिक १०९ झेलांसह अव्वल तर चेन्नईचा सुरेश रैना १०२ झेलांसह दुसऱ्या स्थानी आहे.

याशिवाय, मुंबईला सलामीच्या सामन्यात पराभूत धोनीने आणखी एक पराक्रम केला. चेन्नईच्या संघाचे नेतृत्व करताना धोनीचा हा १००वा विजय ठरला. एखाद्या संघाचे नेतृत्व करताना १०० विजय मिळवणारा धोनी IPL इतिहासातील पहिला कर्णधार ठरला. धोनीने IPLमध्ये कर्णधार म्हणून एकूण १०५ विजय मिळवले आहेत, पण त्यातील ५ विजय त्याने पुणे वॉरियर्स संघासाठी मिळवले होते.

अंतिम षटकात चेन्नईचा विजय

मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी चांगली सुरूवात केली होती. पण रोहित (१२) झेलबाद झाला. पाठोपाठ क्विंटन डी कॉकही ३३ धावांवर माघारी परतला. सूर्यकुमार यादव मोठा फटका खेळण्याच्या नादात १७ धावांवर बाद झाला. सौरभ तिवारीने झुंजार खेळी करत सर्वाधिक ४२ धावा केल्या. हार्दिक पांड्या (१४), कृणाल पांड्या (३) आणि कायरन पोलार्ड (१८) यांनी मात्र निराशा केली.

१६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अनुभवी शेन वॉटसन (५) आणि मुरली विजय (१) स्वस्तात बाद झाले. मग अंबाती रायडू आणि फाफ डु प्लेसिस या जोडीने चेन्नईला सावरलं. रायडूने ७१ धावा ठोकल्या. तो बाद झाल्यावर डु प्लेसिसने नाबाद राहत विजयी चौकार मारला. त्याने नाबाद ५८ धावा केल्या.