दिल्ली कॅपिटल्स विरूद्धच्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं. IPL 2020मधील हा त्यांचा सलग दुसरा पराभव ठरला. दुबईच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नईवर ४४ धावांनी मात केली. विजयासाठी दिलेल्या १७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईला ७ गड्यांच्या मोबदल्यात फक्त १३१ धावाच करता आल्या. राजस्थानविरूद्धच्या सामन्याप्रमाणेच या सामन्यातही कर्णधार महेंद्रसिंग धोनी अपेक्षेपेक्षा उशीरा फलंदाजीला आला आणि त्याचा फटका चेन्नईला बसला. धोनीने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला पण १२ चेंडूत केवळ २ चौकार लगावत तो १५ धावांवर माघारी परतला.

त्यानंतर धोनीच्या खराब फलंदाजीवर टीका करण्यात आली आणि काही मीम्सदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले.

चेन्नईने नाणेफेक जिंकत प्रथम दिल्लीला फलंदाजी आमंत्रण दिलं. शिखर धवन आणि पृथ्वी शॉ या दिल्लीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी ९४ धावांची दमदार सलामी दिली. शिखरने ३५ तर पृथ्वी शॉने ६४ धावांची खेळी केली. त्यानंतर ऋषभ पंत आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही फलंदाजांमध्ये अर्धशतकी भागीदारीही झाली, पण मोक्याच्या षटकांत धावा करण्यात ते अपयशी ठरले. श्रेयस अय्यर माघारी परतल्यानंतर स्टॉयनीस-पंत जोडीने दिल्लीला १७५ धावांपर्यंत मजल मारुन दिली. चेन्नईकडून पियुष चावलाने दोन तर सॅम करनने एक बळी घेतला.

या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईने सावध सुरुवात केली. पण अक्षर पटेलने वॉटसनला लवकर माघारी धाडलं. पाठोपाठ मुरली विजय, ऋतुराज गायकवाड दोघे ठराविक अंतराने माघारी परतले. केदार जाधव आणि फाफ डु-प्लेसिस यांनी भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण मधल्या षटकांत अपेक्षित धावगती राखण्यात ते अपयशी ठरले. डु-प्लेसिस आणि केदार माघारी परतल्यानंतर धोनी आणि रविंद्र जाडेजा यांनी फटकेबाजीचा प्रयत्न केला. पण त्यांनाही फारसे यश आले नाही. दिल्लीकडून कगिसो रबाडाने ३, नॉर्टजेने २ तर अक्षर पटेलने १ बळी घेतला.