MS Dhoni Takes Blame of CSK Loss: बंगळुरूमधील चिन्नास्वामी मैदानात झालेल्या आरसीबी विरुद्ध सीएसकेच्या सामन्यात बंगळुरूने सीएसकेचा अवघ्या दोन धावांनी पराभव करत निसटता विजय मिळविला. या विजयानंतर आता गुणतालिकेत १६ गुण मिळवत आरसीबीने प्रथम स्थान पटकावले आहे. स्पर्धेतून याआधीच बाहेर पडलेल्या सीएसकेसाठी ही प्रतिष्ठेची लढाई होती. सीएसकेने विजयसाठी भरपूर प्रयत्न केले. पण अखेर आरसीबीने बाजी मारली. सामन्यानंतर बोलताना सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीने पराभवासाठी स्वतःला जबाबदार ठरविले.

आयुष म्हात्रे आणि रवींद्र जडेजाच्या वादळीखेळीमुळे सीएसकेचा संघ सामन्यात मजबूत स्थितीत होता. आयुष म्हात्रेने ९४ आणि रवींद्र जडेजाने नाबाद ७७ धावा केल्या. तिसऱ्या विकेसाठी दोघांनी ६४ चेंडूत ११४ धावांची भागीदारी रचली. सामन्यात १७२ धावावर फक्त दोन बळी गेलेले असतानाही सीएसकेचा संघ २० षटकात २१४ धावांचा यशस्वी पाठलाग करू शकला नाही.

अंतिम षटकात सीएसकेला केवळ १५ धावा हव्या होत्या. यश दयाल अखेरचे षटक टाकत असताना त्याने केलेल्या अचूक यॉर्कर माऱ्यामुळे धोनीला तिसऱ्या चेंडूवर आपली विकेट गमावावी लागली. धोनीने ८ चेंडूत १२ धावा केल्या. अखेरच्या षटकात मोठे फटके आवश्यक असताना शिवम दुबेशिवाय धोनी आणि जडेजा फार चमकदार कामगिरी करू शकले नाहीत.

सामन्यानंतर धोनीने म्हटले, “जेव्हा मी फलंदाजीला उतरलो तेव्हा कमी चेंडूत अधिक धावांची आवश्यकता होती. मी आणखी मोठे फटके खेळू शकलो असतो, तर दबाव कमी झाला असता. मी या पराभावाचा दोष माझ्यावर घेतो.” याशिवाय धोनीने सीएसकेच्या फलंदाजाच्या मर्यादांवरही बोट ठेवले. विशेष करून यॉर्कर आणि लो फुलटॉस चेंडूवर चांगले फटके खेळण्यास फलंदाज अपयशी ठरत असल्याचा मुद्दा त्याने उपस्थित केला.

सर्व फलंदाजांना तो (पॅडल) शॉट खेळण्यास सोयीस्कर होत नाही. हा असा प्रकार आहे, जो आधुनिक युगातील क्रिकेटमध्ये फलदाजांनी सराव करून शिकला पाहीजे. परंतु आमचे बहुतेक फलंदाज अशा फटका खेळले नाहीत, असेही धोनीने म्हटले. याशिवाय आरसीबीने फलंदाजी करताना अखेरच्या दोन षटकात मोठी फटकेबाजी केली. विशेषतः रोमारियो शेफर्डने १४ चेंडूत अर्धशतक केले, याचाही उल्लेख धोनीने केला. शेवटच्या दोन षटकात शेफर्डने केलेल्या फलंदाजीमुळे सामना आमच्यापासून दूर गेला, असेही धोनी म्हणाला.

आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने त्याच्या संघाच्या फलंदाजीचे आणि यश दयालने डेथ ओव्हरमध्ये टाकलेल्या गोलंदाजीचे कौतुक केले. आमच्यासाठी हा एक कठीण सामना होता. पण फलंदाजांनी ज्या पद्धतीने फलंदाजी केली आणि गोलंदाजांनी ज्याप्रकारे धाडस दाखवून जबरदस्त गोलंदाजी केली, त्यांनाच या विजयाचे श्रेय जाते.