IPL 2025 MS Dhoni to Lead Chennai Super Kings: महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार बनला आहे. आयपीएल २०२५ च्या मध्यात, धोनीला अचानक पुन्हा एकदा चेन्नईचे कर्णधारपद मिळाले आहे. चेन्नईला पाच आयपीएल जेतेपद मिळवून देणारा एमएस धोनी २०२१ नंतर पुन्हा संघाचा कर्णधार म्हणून परतत आहे. चेन्नई सुपर किंग्स संघ व्यवस्थापनाने अचानक पोस्ट शेअर करत हा मोठा निर्णय जाहीर केला आहे.
आयपीएल २०२५ मधील खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जसाठी, ही बातमी महत्त्वाच्या सामन्यापूर्वी आली आहे. चेन्नईचा सहावा सामना शुक्रवार, ११ एप्रिल रोजी खेळला जाणार आहे आणि त्याच्या एक दिवस आधी संघात हा मोठा बदल झाला आहे. चेन्नई संघाच्या या निर्णयामुळे धोनी या आयपीएल २०२५ च्या मध्यातच निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चांवर पूर्णविराम लागला आहे.
धोनीच्या खांद्यावर पुन्हा CSK च्या नेतृत्त्वाची जबाबदारी
संघाने दिलेल्या माहितीनुसार, कर्णधारपदातील हा बदल ऋतुराज गायकवाडच्या कोपराच्या दुखापतीमुळे झाला आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात कर्णधार आणि स्टार फलंदाज गायकवाडच्या कोपराला दुखापत झाली. पण यानंतर तो पुढील २ सामने खेळला पण आता त्याच्या कोपराच्या हेयरलाईनमध्ये फ्रॅक्चर आढळले आहे, ज्यामुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
सीएसके वि. दिल्ली कॅपिटल्स यांच्यात ५ एप्रिलला झालेल्या सामन्यात ऋतुराजच्या हाताच्या दुखापतीमुळे धोनी संघाचे नेतृत्त्व करणार अशी चर्चा होती. चेन्नईमध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यापूर्वीच गायकवाडच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते आणि तो त्या सामन्यातून बाहेर पडेल असे मानले जात होते. पण गायकवाड तो सामना खेळला आणि त्यानंतर तो पंजाब किंग्जविरुद्धही सामना खेळला होता. पण या दोन्ही सामन्यांमध्ये तो फक्त ६ धावा करू शकला, यावरून तो कदाचित पूर्णपणे फिट नव्हता, असे दिसून येते.
पण आता गायकवाड दुखापतीमुळे संघाबाहेर झाल्यानंतर स्वाभाविकच संघाने धोनीला पुन्हा कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला. या हंगामात संघाची सुरुवात चांगली झालेली नाही आणि पहिल्या सामन्यातील विजयानंतर त्यांना सतत पराभवांचा सामना करावा लागत आहे. आतापर्यंत ५ सामने खेळलेल्या चेन्नईने सलग ४ सामने गमावले आहेत आणि फक्त २ गुणांसह संघ ९व्या स्थानावर आहे. आता सर्वांच्या नजरा धोनीवर असतील, ज्याने २०२२ च्या हंगामाच्या मध्यात संघाची सूत्रं हाती घेतली होती.
आयपीएल २०२२ मध्ये रवींद्र जडेजा संघाचा कर्णधार होता, पण सततच्या पराभवानंतर त्याच्याऐवजी धोनीने संघाची सूत्रे हाती घेतली आणि पुढच्या हंगामात चेन्नईला चॅम्पियन बनवले.