IPL 2025 Who is Raghu Sharma He Replaces Vighnesh Puthur in MI Squad: आयपीएल २०२५ दरम्यान मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. खराब सुरूवातीनंतर कमालीचा फॉर्म मिळवलेल्या मुंबई इंडियन्सचा उत्कृष्ट खेळाडू या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. आयपीएल २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्सविरूद्ध पदार्पण करत आपल्या कामगिरीने सर्वांची मनं जिंकून घेणारा विघ्नेश पुथूर आयपीएलच्या उर्वरित स्पर्धेतून बाहेर झाला आहे.
आयपीएल २०२५ मध्ये इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या पुथूरने ३ मोठे विकेट घेत सर्वांनाच आपल्या गोलंदाजीने चकित केलं. त्याच्या गोलंदाजीने एमएस धोनीही खूप प्रभावित झाला. सामना संपल्यानंतर धोनीने त्याची भेट घेत कौतुक केलं होतं. मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सविरूद्धच्या सामन्यापूर्वी ही माहिती दिली. विघ्नेश पुथूरच्या जागी मुंबई इंडियन्सने बदली खेळाडूची घोषणादेखील केली आहे. विघ्नेशच्या जागी संघाने ३२ वर्षीय फिरकीपटूला संघात संधी दिली आहे.
विघ्नेश पुथूर का झाला स्पर्धेबाहेर?
विघ्नेश पुथूरला दुखापत झाली असून तो दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला आहे. विघ्नेशच्या दुखापतीबाबत मुंबई इंडियन्सनने निवेदन जारी करत माहिती दिली. यानुसार, पुथूरच्या पायाच्या दोन्ही पोटऱ्यांमध्ये बोन स्ट्रेस रिएक्शनची समस्या त्याला जाणवत आहे. त्यामुळे, त्याला संपूर्ण हंगामासाठी बाहेर ठेवण्यात आले आहे आणि तो एकही सामना खेळू शकणार नाही.
विघ्नेश पुथूर स्पर्धेबाहेर झाला असला तरी संघाबरोबरच असणरा आहे. आता विघ्नेश मुंबई इंडियन्सच्या वैद्यकीय आणि कंडिशनिंग टीमच्या देखरेखीखाली त्याच्या पुनर्वसनावर लक्ष केंद्रित करेल. त्याने आयपीएल २०२५ मध्ये ५ सामने खेळले आणि १८.१७ च्या सरासरीने ६ विकेट्स घेतल्या.
कोण आहे रघु शर्मा? विघ्नेश पुथूरला मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात केलं रिप्लेस
मुंबई इंडियन्सच्या संघामध्ये विघ्नेश पुथूरच्या जागी ३२ वर्षीय फिरकीपटू रघु शर्मा याला बदली खेळाडू म्हणून घेण्यात आले आहे. विघ्नेश पुथूर हा मुंबईच्या ताफ्यात सपोर्ट बॉलर होता, पण आता त्याची मुख्य संघात निवड झाली आहे. मूळचा पंजाबचा असलेला रघु शर्मा हा उजव्या हाताचा लेग-ब्रेक गोलंदाज आहे. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंजाब आणि पुदुच्चेरीकडून खेळला आहे. ११ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये, रघुने १९.५९ च्या सरासरीने ५७ विकेट्स घेतल्या आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी ५६ धावांत सात विकेट्स आहे.
लिस्ट ए क्रिकेटमध्ये रघुने ९ सामन्यांमध्ये १४ विकेट्स घेतल्या आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोत्तम कामगिरी ४/३७ आहे. त्याने ३ टी-२० सामनेही खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ३ विकेट्स घेतल्या आहेत.
मुंबई इंडियन्सचा आयपीएल २०२५ मधील पुढचा सामना आज म्हणजे १ मे रोजी राजस्थान रॉयल्स संघाविरूद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर खेळणार आहे. मुंबईचा संघ गुणतालिकेत १२ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.