LSG vs SRH IPL 2025 Nicholas Pooran Angry on Abdul Samad : इंडियन प्रीमियर लीग २०२५ मधील लखनौ सुपर जायंट्सचं आव्हान संपलं आहे. लखनौच्या मैदानावर सोमवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात हैदराबादने लखनौचा सहज ६ गडी राखून पराभव केला. हैदराबादच्या फलंदाजांनी लखनौने दिलेलं २०६ धावांचं लक्ष्य १० चेंडू शिल्लक ठेवत पार केलं. या पराभवामुळे लखनौचं प्लेऑफचं स्वप्न सलग दुसऱ्या वर्षी भंगलं आहे. दरम्यान, या सामन्यात अनेक लक्षवेधी घटना घडल्या. मिचेल मार्श, एडन मार्करम, निकोलस पूरन, अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासन यांची धडाकेबाज फलंदाजी, दिग्वेश राठी व अभिषेक शर्मामधील बाचाबाची आणि निकोलस पूरन याची आदळआपट, या घटनांनी सामन्याची रंगत वाढवली होती.
लखनौ सुपर जायंट्सचा विस्फोटक फलंदाज निकोलस पूरन याचा या सामन्यातील एक व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. सोमवारच्या सामन्यावेळी ड्रेसिंग रूममध्ये निकोलसचा रौद्रावतार पाहायला मिळाला. तो इतका संतापला होता की त्याने ड्रेसिंग रूमच्या काचेच्या रेलिंगवर पॅड आपटलं. त्याची ड्रेसिंग रूममध्ये आदळआपट चालू होती.
पूरनचा अब्दूल समदवर राग
लखनौच्या फलंदाजीवेळी निकोलसने नेहमीप्रमाणे वेगवान खेळ सुरू केला होता. मात्र, तो २६ चेंडूत ४५ धावांवर खेळत असताना यष्टीरक्षक इशान किशनने त्याला धावचित केलं. खरंतर, अब्दूल समदच्या चुकीमुळे तो धावचित झाला होता. २० व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर निकोलसला दोन धावा घ्यायच्या होत्या. मात्र, अब्दुल समदने नकार दिला. त्यानंतरच्या चेंडूवर धाव घेताना पूरन व समदमध्ये ताळमेळ नसल्यामुळे किशनला निकोलसला धावचित करण्याची संधी मिळाली आणि त्याने त्याचं काम चोख केलं.
पूरन बाद झाल्यावर तो रागात ड्रेसिंग रूममध्ये परतला. तो बाद झाल्यावर लखनौचा डाव सांभाळण्याची जबाबदारी अब्दूल समदवर होती. मात्र, पुढच्याच चेंडूवर समद त्रिफळाचित झाला. त्यामुळे पूरन आणखी संतापला आणि त्याने त्याचं पॅड ड्रेसिंग रूममधील काचेवर फेकलं. त्याची आदळआपट पाहून ड्रेसिंग रूममध्ये शांतता पसरली होती. समद बाद होऊन ड्रेसिंग रूममध्ये गेल्यावर दोघांमध्ये काय बोलणं होईल याची उत्सुकता ताणली गेली होती.