IPL 2025 PBKS vs MI Match Highlights in Marathi: पंजाब किंग्सने अखेरच्या साखळी सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभवाचं पाणी पाजत महत्त्वपूर्ण विजय नोंदवला. पंजाबने ७ विकेट्सने मुंबईचा पराभव करत आता संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानी पोहोचला आहे. आरसीबीचा अखेरचा सामना आता लखनौ सुपर जायंट्स संघाविरूद्ध असणार आहे. पण पंजाबने क्वालिफायर वनसाठी आपली जागा निश्चित केली आहे.
पंजाब किंग्सचे फलंदाज प्रियांश आर्य आणि जोश इंग्लिस यांनी शतकी भागीदारी करत सामना मुंबईपासून दूर नेला. प्रियांश आणि जोश इंग्लिस यांनी अर्धशतकी खेळी केल्या. याशिवाय पहिल्या डावात पंजाब किंग्सच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत मुंबईच्या धावांवर अंकुश ठेवला. या पराभवासह मुंबईचा संघ चौथ्या स्थानीच राहणार आहे. पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सविरूद्धचा सामना एकतर्फी करत संघाला सामन्यात परण्याची संधीच दिली नाही.
जयपूरमध्ये खेळल्या गेलेल्या दोन्ही संघांच्या लीग टप्प्यातील शेवटच्या सामन्यात, पंजाबने अर्शदीप सिंगच्या उत्कृष्ट गोलंदाजी आणि प्रियांश आर्य-जोश इंग्लिसच्या जोरदार प्रतिआक्रमणाच्या जोरावर १९ षटकांत १८५ धावांचे लक्ष्य गाठले आणि गुणतालिकेत पहिले स्थान मिळवले आणि आता पहिला क्वालिफायर सामना संघ खेळणार आहे.
सूर्यकुमार यादवने २९ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह ५७ धावा करत अखेरच्या चेंडूवर झेलबाद झाला. पण त्याला दुसऱ्या टोकाने फारशी साथ मिळाली नाही. हार्दिक पंड्या, विल जॅक्स आणि नमन धीर यांनी जलद धावा केल्या. पण शेवटच्या षटकात अर्शदीपने फक्त ३ धावा देऊन २ विकेट घेतले आणि मुंबईला २०० धावा करण्यापासून रोखले.
पंजाब किंग्सकडून १८६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना प्रभसिमरन सिंग बाद झाला. तर प्रियांश आर्य आणि जोश इंग्लिस यांनी शतकी भागीदारी केली. प्रियांश आर्यने ३५ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांसह ६२ धावा केल्या. तर जोश इंग्लिस ४२ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटाकारांसह ७३ धावा करत बाद झाला. तर श्रेयस अय्यरने १६ चेंडूत २६ धावा केल्या आणि षटकारासह संघाला १८.३ षटकांत ७ विकेट्सने विजय मिळवून दिला.
पंजाबने १४ सामन्यांत १९ गुणांसह गुजरातला मागे टाकत पहिले स्थान मिळवले आणि आता ते पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानावर राहतील हे निश्चित आहे. या आधारावर, संघ २९ मे रोजी पहिला क्वालिफायर सामना खेळेल, जिथे त्यांना अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी दोन संधी मिळतील. पण पहिल्या क्वालिफायरमध्ये त्यांचा सामना कोणाशी होईल हे मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यात निश्चित होईल.
जर बेंगळुरू जिंकला तर त्यांना पहिले किंवा दुसरे स्थान मिळेल आणि त्यांचा सामना पंजाबशी होईल. पण जर बेंगळुरूचा पराभव झाला किंवा सामना अनिर्णित राहिला तर गुजरात दुसऱ्या स्थानावर राहील, तर बेंगळुरू तिसऱ्या स्थानावर राहील आणि त्यांचा सामना मुंबईशी होईल.