RCB has replaced David Willey with Kedar Jadhav: आयपीएलच्या १६ व्या हंगामातील ४३ वा सामना शुक्रवारी लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी आरसीबी संघाकडून मोठी बातमी समोर आली आहे. आरसीबीने दुखापतग्रस्त डेव्हिड विलीच्या जागी केदार जाधवला त्यांच्या संघाचा भाग बनवण्याची घोषणा केली आहे. आरसीबीने जाधवला त्याच्या १ कोटी रुपयांच्या मूळ किमतीत संघात समाविष्ट केले आहे.
डेव्हिड विली या हंगामात आरसीबीसाठी केवळ ४ सामने खेळू शकला, ज्यामध्ये त्याने ३ विकेट घेतल्या. केदार जाधवबद्दल बोलायचे तर, त्याने २०१० च्या आयपीएल हंगामात पदार्पण केले होते. पंरतु १६ व्या हंगामाच्या लिलावात तो अनसोल्ड राहिला होता. यानंतर तो जिओ सिनेमासाठी मराठी भाषेत समालोचनाची भूमिका बजावत होता.
केदार जाधवची आयपीएल कारकीर्द –
केदार जाधवने आयपीएलमध्ये आतापर्यंत ९३ सामने खेळले आहेत. त्यापैकी ८० डावात फलंदाजी करताना २२.१५ च्या सरासरीने एकूण ११९६ धावा केल्या आहेत. यादरम्यान जाधवच्या बॅटमधून ४ अर्धशतकं झळकली आहेत. केदार जाधव यापूर्वीही आरसीबी संघाचा भाग होता, ज्यामध्ये त्याला संघाकडून एकूण १७ सामने खेळण्याची संधी मिळाली होती.
हेही वाचा – IPL 2023 RCB vs LSG: विराट कोहलीला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी! लखनऊविरुद्ध फक्त ‘इतक्या’ धावांची गरज
आरसीबीची या मोसमातील आतापर्यंतची कामगिरी –
आयपीएलच्या या हंगामातील आरसीबीच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले, तर ८ सामने खेळल्यानंतर संघाने केवळ ४ सामने जिंकले आहेत. या हंगामात आतापर्यंत संघासाठी एक समस्या निर्माण झाली आहे ती म्हणजे मधल्या फळीकडून अपेक्षेप्रमाणे कामगिरी न करणे. त्यामुळेच केदार जाधवला संघात सामील करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या येण्याने मधल्या फळीला बळकटी मिळेल, अशी आशा आरसीबी संघाला आहे.
प्लेऑफच्या दृष्टीने आरसीबीसाठी विजय आवश्यक आहे –
प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध विजय आवश्यक आहे. आयपीएल २०२३ मध्ये, आरसीबीने ८ सामने खेळले आहेत, ज्यापैकी ४ जिंकले आहेत आणि ४ हरले आहेत. फाफ डू प्लेसिसचा संघ ८ गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे.