IPL 2025 Riyan Parag 6 Ball Six Sixes Video KKR vs RR: राजस्थान रॉयल्स संघाचे यंदा कर्णधारपद सांभाळत असलेल्या रियान परागला अखेरीस सूर गवसला आहे. रियानने केकेआरविरूद्ध सामन्यात वादळी फटकेबाजी करत मोईन अलीची चांगली फटकेबाजी केली. तर वरूण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर स्वीप शॉटने षटकार मारत सर्वांचं लक्ष वेधलं. यासह रियान परागने एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे, जो आजवर आयपीएलमध्ये कोणत्याच खेळाडूला जमलेला नाही.
आयपीएल २०२५ चा हंगामा राजस्थान रॉयल्ससाठी चांगला राहिला नाही आणि संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला. दरम्यान, कर्णधार संजू सॅमसनच्या दुखापतीमुळे संघाचे नेतृत्व करणाऱ्या रियान परागची कामगिरीही चांगली नव्हती आणि तो सतत अपयशी ठरत राहिला. पण केकेआरविरूद्ध सामन्यात रियान परागने वादळी खेळी करत सर्वांनाच चकित केलं.
ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना २०६ धावांची मोठी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात राजस्थानची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. संघाने ८ षटकात ७१ धावांत ५ विकेट गमावल्या होत्या. यानंतर रियान परागने जबाबदारी घेत शानदार फटकेबाजी केली.
काही वेळ सावध फलंदाजी केल्यानंतर, रियानने मोठे फटके खेळण्याचा निर्णय घेतला आणि मोईन अलीची त्याने चांगलीच धुलाई केली. या षटकाच्या अगदी आधी, परागने सलग २ चौकार मारले होते. नंतर त्याने १३ व्या षटकात मोईनविरुद्ध सलग पाच षटकार लगावले. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर शिमरॉन हेटमायरने एक धाव घेतली आणि पराग स्ट्राईकवर आला. त्यानंतर परागने षटकातील उर्वरित ५ चेंडूंवर सलग ५ षटकार मारले. यादरम्यान, त्याने आपले अर्धशतकही पूर्ण केले आणि त्याच्या एका षटकारामुळे स्टेडियममध्ये ठेवलेल्या टाटा कर्व्ह कारला थोडासा डेंटही लागला.
यानंतरही रियान पराग थांबला नाही आणि पुढच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर स्ट्राईकवर आला आणि वरुण चक्रवर्तीच्या चेंडूवर स्वीप खेळत एक कमालीचा षटकार मारला. यासह, राजस्थानच्या कर्णधाराने सलग ६ चेंडूत ६ षटकार मारले आणि राजस्थानला सामन्यात कायम ठेवले. यानंतर, रियन त्याच्या शतकाच्या दिशेने आणि संघाला विजयाच्या दिशेने नेत होता. पण १८ व्या षटकात हर्षित राणाने त्याला बाद केलं आणि त्याचे शतक फक्त ५ धावांनी हुकलं. रियानने ४५ चेंडूत ९५ धावा केल्या, ज्यात ६ चौकार आणि ८ षटकारांचा समावेश होता.
रियान परागच्या वादळी खेळीनंतर शुभम दुबेने अखेरच्या षटकात चौकार-षटकार लगावत संघाला विजयापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. पण केकेआरचा संघ अखेरच्या चेंडूवर एक धावेने जिंकला आणि त्यांचे आयपीएलमधील आव्हानही कायम ठेवले.