Rohit Sharma Viral Video: मुंबई इंडियन्सला पाच ट्रॉफी जिंकून देणारा कर्णधार रोहित शर्मा सर्वच मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचा लाडका खेळाडू आहे. रोहित शर्माने काल म्हणजेच ३० एप्रिलला त्याचा ३८ वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसानिमित्त रोहित शर्माने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये त्याने त्याचा वाढदिवस, कुटुंब, करियर याबाबत वक्तव्य केली आहेत. दरम्यान त्याने आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

मुंबई इंडियन्सचा आयपीएल २०२५ मधील पुढील सामना आज होणार आहे. हा सामना राजस्थानच्या घरच्या मैदानावर जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्सविरूद्ध होणार आहे. रोहित शर्मा यंदाच्या मोसमात संघासाठी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळताना दिसत आहे. खराब सुरूवातीनंतर रोहित शर्माला अखेरीस सूर गवसला आहे आणि त्याने सलग दोन अर्धशतकं झळकावली.

मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माने एक मोठे विधान केलं आहे. रोहित म्हणाला की, स्वतःच्या कामगिरीपेक्षा ट्रॉफी जास्त महत्त्वाची असते आणि मी सुरुवातीपासूनच हे सांगत आलो आहे की तुम्ही कितीही धावा केल्या तरी, तुमचा संघ स्पर्धा जिंकला तरच त्याचा काही उपयोग नाही. रोहित शर्माने एक उदाहरणही दिलं आणि म्हणाला, माझ्यासाठी एक हंगाम असा होता जेव्हा मी ६००-७०० धावा केल्या पण माझा संघ स्पर्धा जिंकू शकला नाही.

रोहित शर्माला विमल कुमारने मुलाखतीत विचारलं, रोहित शर्मा इतका मोठा फलंदाज आहे पण तो आयपीएलमध्ये ६००-७०० धावा करत नाही. यावर रोहित म्हणाला, “या ६००, ७००, ८०० धावांचा काही उपयोग नाही, जर तुमचा संघ ट्रॉफीचं जिंकत नसेल. संघ फायनलपर्यंत जात नाहीये आणि संघ जिंकत नाहीये तर त्या ५०० धावांचं मी काय करू. ठीके माझ्यासाठी त्या धावा करणं चांगलंय, पण संघासाठी ते चांगलं नाहीये ना.”

पुढे रोहित म्हणाला, “माझं असं लक्ष्य कधीचं नव्हतं की मला सीझनमध्ये इतक्या धावा करायच्या आहेत. मला संघाला सामने जिंकून द्यायचे आहेत, मी संघाला सामने जिंकून देण्याचा प्रयत्न करतो. मी असं नाही म्हणत आहे की, मी २०-३० धावा केल्याने संघ जिंकतो आहे. पण माझा फोकस हा नेहमी असतो की मी संघासाठी काय योगदान देऊ शकतो, ज्याचा संघाला फायदा होईल. मुंबई इंडियन्सचा संघ जेव्हा ट्रॉफी जिंकला आहे. तेव्हा संघातील कोणताच खेळाडू ऑरेंज कॅप जिंकला नाही, यात काहीतरी तथ्य आहे ना.”

रोहित शर्माने २०१९ मध्ये झालेल्या वर्ल्डकपमध्ये ५ शतकं झळकावली होती. पण भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला नव्हता आणि सेमीफायनलमध्ये स्पर्धेतून बाहेर झाला. याचाही उल्लेख रोहित शर्मा मुलाखतीत सांगत होता की, मी वर्ल्डकपमध्ये ५ शतकं केली पण संघ अंतिम फेरीतही पोहोचला नाही. मग त्या धावांचा काय उपयोग झाला.