मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुनी गुरुवारी अखेरची साखळी लढत जिंकून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटची बाद फेरी गाठण्याचा निर्धार केला आहे. तर गुणतालिकेत अग्रस्थानावर असलेला गुजरात टायटन्सचा संघ विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी प्रयत्नशील आहे.

गुजरातसाठी ‘आयपीएल’चा पदार्पणीय हंगाम स्वप्नवत ठरला आहे. त्यांनी १३ सामन्यांत सर्वाधिक १० विजयांसह २० गुण कमावले आहेत. त्यामुळे गुरुवारी अखेरची लढत गमावली तरीही गुजरातचा संघच गुणतालिकेत अव्वल ठरणार आहे. दुसरीकडे, बंगळूरुची कामगिरी संमिश्र ठरली आहे. त्यांनी १३ सामन्यांपैकी सात विजयांसह १४ गुण मिळवले आहेत, तर सहा सामने गमावले आहेत. परंतु शेवटचा सामना जिंकूनही -०.३२३ ही निव्वळ धावगती बंगळूरुसाठी अडचणीची ठरू शकेल. दिल्ली कॅपिटल्सने शेवटच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला हरवले तरी ते १६ गुणांसह बाद फेरीत स्थान मिळवू शकतील. दिल्लीची निव्वळ धावगती  ०.२५५ असल्यामुळे बंगळूरुला याहून सरस कामगिरी करण्यासाठी मोठय़ा फरकाने विजय मिळवावा लागणार आहे. सलग दोन विजयांसह बंगळूरुने आशा उंचावल्या होत्या. परंतु याआधीच्या सामन्यात पंजाब किंग्जकडून तब्बल ५४ धावांनी पत्करलेल्या पराभवामुळे त्यांना धक्का बसला आहे.

कोहलीकडून अपेक्षा

विराट कोहली (२३६ धावा) अद्यापही धावांसाठी झगडत आहे. पंजाबविरुद्धच्या सामन्यात त्याला फक्त २० धावा करता आल्या होत्या. मात्र अखेरच्या लढतीत बंगळूरुला बाद फेरीपर्यंत नेणाऱ्या खेळीची त्याच्याकडून अपेक्षा आहे. कर्णधार फॅफ डय़ूप्लेसिस (३९९ धावा), दिनेश कार्तिक (२८५ धावा), महिपाल लोमरोर (६४ धावा) यांच्याकडून मोठय़ा खेळीची अपेक्षा आहे. ग्लेन मॅक्सवेल (२२८ धावा) आणि रजत पाटीदार (१६३ धावा) चांगल्या सुरुवातीचे मोठय़ा धावसंख्येत रूपांतरण करण्यात अपयशी ठरत आहेत. गोलंदाजीत हर्शल पटेल (१८ बळी) आणि वािनदू हसरंगा (२३ बळी) यांच्यावर बंगळूरुची मदार आहे. पंजाबच्या फलंदाजांविरुद्ध जोश हेझलवूड (१३ बळी) आणि मोहम्मद सिराज (८ बळी) महागडे ठरले असतानाही पटेलने चार आणि हसरंगाने दोन बळी मिळवले होते.

गिल, पंडय़ावर मदार

शुभमन गिल (४०२ धावा), हार्दिक पंडय़ा (३५१ धावा), डेव्हिड मिलर (३४७ धावा), वृद्धिमान साहा (२८१ धावा) आणि राहुल तेवतिया (२१५ धावा) यांच्या दर्जेदार कामगिरीमुळे गुजरातची फलंदाजी भक्कम मानली जात आहे. त्यांना अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या (१८ बळी) नेतृत्वाखालील गोलंदाजीच्या माऱ्याची पुरक साथ मिळत आहे. युवा यश दयाल (९ बळी), लॉकी फग्र्युसन (१२ बळी), हार्दिक (४ बळी) आणि अल्झारी जोसेफ (७ बळी) यांचा वेगवान मारा त्यांच्याकडे आहे. याचप्रमाणे अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज रशिद खान (१६ बळी) आणि आर. साइकिशोर (३ बळी) यांच्यावर फिरकीची भिस्त आहे.