Net Worth Of jitesh Sharma: जितेश शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला. याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला इतक्या मोठ्या धावांचा पाठलाग करता आला नव्हता. आयपीएल २०२५ स्पर्धेतील क्वालिफायर १ मध्ये प्रवेश करण्यासाठी लखनऊ सुपर जायंट्स संघाला पराभूत करणं गरजेचं होतं.

या महत्वाच्या सामन्यात लखनऊने बंगळुरूसमोर विजयासाठी २२८ धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना, जितेश शर्माने नाबाद ८५ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने क्वालिफायर १ मध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना पंजाब किंग्जविरूद्ध होणार आहे. जो संघ हा सामना जिंकेल, त्या संघाला थेट फायनलमध्ये प्रवेश करण्याची संधी असणार आहे. या सामन्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार जितेश शर्माची तुफान चर्चा रंगली आहे. दरम्यान त्याची एकूण संपत्ती किती? जाणून घ्या.

जितेश शर्माची एकूण संपत्ती किती?

देशांतर्गत क्रिकेटमध्ये विदर्भाकडून खेळणारा जितेश शर्मा २०२२ पासून आयपीएल स्पर्धा खेळत आहे. जितेशचा जन्म २२ ऑक्टोबर १९९३ मध्ये अमरावतीत झाला. आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्याला ११ कोटींची बोली लावून आपल्या संघात स्थान दिलं. बीसीसीआयने २०२३-२४ साठी जाहीर केलेल्या सेन्ट्रल कॉन्ट्रॅक्टच्या यादीत जितेश शर्माचा ग्रेड सी मध्ये समावेश करण्यात आला होता. यानुसार त्याला वर्षाला १ कोटी रूपये मिळत होते. पण यावर्षी जाहीर करण्यात आलेल्या यादीतून त्याला वगळण्यात आले आहे. यासह देशांतर्गत क्रिकेट खेळूनही त्याची चांगलीच कमाई होते.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयाचा हिरो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लखनऊच्या एकाना स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या लखनऊ सुपर जायंट्स संघाने २० षटकांअखेर २२७ धावांचा डोंगर उभारला. लखनऊकडून कर्णधार ऋषभ पंतने ११८ धावांची खेळी केली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला हा सामना जिंकण्यासाठी २२८ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना जितेश शर्माने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत नाबाद ८५ धावांची खेळी केली. यासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने हा सामना ६ गडी राखून आपल्या नावावर केला.