कॉमेन्ट्री बॉक्समध्ये आपल्या मजेदार वक्तव्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या समालोचकांपैकी एक म्हणजे भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावस्कर. मात्र काल झालेल्या चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यामध्ये कॉमेन्ट्रीदरम्यान मजेदार वक्तव्य करण्याच्या नादात सुनील गावस्कर यांनी केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झालाय. सुनील गावस्करांनी वेस्ट इंडिजचा खेळाडू शिमरोन हेटमायरच्या पत्नीबद्दल केलेल्या विधानावरुन वाद झालाय. अनेकांनी गावस्कर यांनी केलेलं हे वक्तव्य मानहानीकारक असल्याचं मत व्यक्त केलंय.

चेन्नईच्या संघाविरुद्ध हेटमायरला संघात स्थान देण्यात आलेलं. फलंदाजीसाठी हेटमायर मैदानात आला. हेटमायरने संघाचा नेट रनरेट चेन्नईपेक्षा अधिक राहील या हिशोबाने फटकेबाजी करणं अपेक्षित होतं. हेटमायर मैदानावर आल्यावर क्रीजवर सेट होत असतानाच तो पहिला चेंडू खेळण्याआधीच गावस्कर मजेदार वक्तव्य करण्याच्या नादात नको ते बोलून गेले.

“मोठा प्रश्न हा आहे की शिमरोन हेटमायरच्या पत्नीने नुकतीच डिलेव्हरी केलीय, आता हेटमायर राजस्थान रॉयल्ससाठी डिलेव्हर करु शकेल का?”, असं गावस्कर म्हणाले. गावस्कर यांनी हेटमायच्या पत्नीचं बाळंतपण झाल्याचा संदर्भ देत डिलेव्हरी हा शब्द काहीतरी करुन दाखवणे या अर्थाने डिलेव्हरी म्हणून वापरण्याच्या नादात शब्द खेळ करत हे वक्तव्य केलं. गावस्कर यांचं हे वक्तव्य ऐकून कॉमेन्ट्री बॉक्समध्ये लोक हसू लागल्याचं आवाजावरुन समजत होतं. गावस्कर यांच्या या वक्तव्यावरुन आता त्यांच्यावर टीका केली जातेय.

शिमरोन हेटमायरला नुकतीच पुत्ररत्न प्राप्ती झालीय. हेटमायर याच कारणामुळे काही काळ आयपीएल २०२२ मधून ब्रेक घेऊन कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी मायदेशी गेला होता. याचाच संदर्भ देत गावस्कर यांनी हे वक्तव्य केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी गावस्कर विराट कोहलीसंदर्भात बोलताना अनुष्का शर्माचा संदर्भ देत केलेलं वक्तव्यही चांगलेच वादात सापडले होते.