पुणे : माजी कर्णधार आणि तारांकित फलंदाज विराट कोहलीला यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये धावांसाठी झगडावे लागत आहे. मात्र, त्याच्या कामगिरीची चिंता नसून त्याला लवकरच सूर गवसेल, असा  रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचे प्रशिक्षक संजय बांगर यांना विश्वास आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोहलीने गेल्या पाच डावांमध्ये ९, ०, ०, १२ आणि १ अशा धावा केल्या आहेत. परंतु कोहली लवकरच दमदार पुनरागमन करेल असे बांगर यांना वाटते. ‘‘कोहली उत्कृष्ट क्रिकेटपटू आहे. कठीण परिस्थितीतून बाहेर कसे पडायचे हे त्याला ठाऊक आहे. त्याच्या धावा होत नसल्या, तरी त्याचा आत्मविश्वास खालावलेला नाही. त्याला लवकरच सूर गवसेल याची खात्री आहे,’’ असे बांगर म्हणाले.

‘‘सरावादरम्यान प्रयोग करण्यासाठी कोहली घाबरत नाही. तो खूप मेहनती आहे आणि हीच गोष्ट त्याला खास बनवते. तो मानसिकदृष्टय़ा कणखर आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीबाबत मला फारशी चिंता वाटत नाही,’’ असेही बांगर यांनी नमूद केले.

कोहलीला विश्रांतीची गरज -शास्त्री
नवी दिल्ली : भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींनी कोहलीला एका आठवडय़ात दुसऱ्यांदा विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. ‘‘विराटने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत भारताचे नेतृत्व केले. तो सलग क्रिकेट खेळत आहे. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय कारकीर्द प्रदीर्घ करण्यासाठी त्याने विश्रांती घेणे योग्य ठरेल. पुढील सहा-सात वर्षे सातत्यपूर्ण कामगिरी करायची असल्यास त्याने त्वरित ‘आयपीएल’मधून माघार घेण्याबाबतही विचार करावा’’ असे शास्त्रींनी सांगितले.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay banger backs virat kohli s performance in ipl
First published on: 28-04-2022 at 04:11 IST