PBKS vs MI Qualifier 2 IPL 2025: आयपीएल २०२५ दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात मुंबई इंडियन्स वि. पंजाब किंग्सचे संघ एकमेकांविरूद्ध खेळत आहेत. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. नाणेफेक झाल्यानंतर अहमदाबादमध्ये पावसाने हजेरी लावली. जवळपास २ तास पाऊस लपाछपी खेळताना दिसला. अखेरीस ९.४५ वाजता सामना सुरू झाला आणि सामना पूर्ण २० षटकांचा खेळवला जात आहे.
पंजाब किंग्सने सामन्याची नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तर मुंबई इंडियन्सचा संघ प्रथम फलंदाजीला उतरला. २ तासांनी पावसामुळे सामना सुरू झाल्यानंतर सावधतेने फलंदाजी करणं महत्त्वाचं होतं. रोहित शर्मा आणि जॉनी बेयरस्टोने अधिक सावध आणि सांभाळून सुरूवात केली. पण श्रेयस अय्यरने रोहितला बाद करण्यासाठी सापळा रचला, जो यशस्वी ठरला.
रोहित शर्माचा झेल पुन्हा एकदा दुसऱ्या षटकात सोडला. यानंतर रोहितने चौकाराने पुढच्या षटकाची सुरूवात केली. श्रेयस अय्यरने पॉवरप्लेमध्ये आपल्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं. पहिलं षटक अर्शदीपने तर दुसरं षटक काईल जेमिसनने टाकल. तिसरं षटकही तो अर्शदीपला देणार असं सर्वांना वाटलं आणि इथेच त्यांना सर्वांना चकित केलं.
श्रेयस अय्यरने तिसरं षटक टाकण्याची जबाबदारी मार्कस स्टॉयनिसला दिली. स्टॉयनिस हा पार्ट टाईम गोलंदाज आहे. पण हाच श्रेयस अय्यरचा मास्टरस्ट्रोक ठरला. रोहितने त्याच्या षटकात मोठे फटके खेळण्याची सुरूवात केली. रोहितने पहिल्या चेंडूवर त्याच्या डोक्यावरून चौकार लगावला. यानंतर रोहित शर्मा शॉर्ट बॉलवर पूल शॉट मारायला गेला आणि झेलबाद झाला. यासह पंजाब किंग्सला सामन्यातली मोठी विकेट मिळाली.
पूल शॉट हा रोहित शर्माच्या ठेवणीतला शॉट आहे. तो अगदी लिलया हा फटका खेळताच षटकारासाठी पाठवतो. पण चेंडू आणि बॅटचं कनेक्शन नीट नाही झालं तर या मैदानाची बाऊँड्री मोठी असल्याने रोहित अगदी सीमारेषेच्या टोकावर झेलबाद झाला. विजयकुमार वैशाकने कोणतीही चूक न करता झेल टिपला. रोहित शर्मा बाद झाल्यानंतरही जॉनी बेयरस्टो आणि तिलक वर्माने पॉवरप्लेमध्ये चांगली धावसंख्या उभारली. मुंबईने पॉवरप्लेमध्ये १ बाद ६५ धावा केल्या आहेत. यानंतर बेयरस्टो ३५ धावा करत झेलबाद झाला.