GT vs RR, Shubman Gill Wicket Controversy: गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार शुबमन गिल या हंगामात दमदार फलंदाजी करत आहे. या हंगामातील सुरूवातीच्या सामन्यांमध्ये त्याला हवी तशी सुरूवात करता आली नव्हती. मात्र त्यानंतर त्याने चांगला पिकअप घेतला आहे. गुजरातला गुणतालिकेत अग्रगण्य स्थानी पोहोचवण्यात गिलने बहुमूल्य योगदान दिलं आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाविरूद्ध झालेल्या सामन्यातही त्याने दमदार सुरूवात करून दिली. या डावात त्याला शतक झळकावण्याची संधी होती. मात्र, त्याला धावबाद होऊन माघारी परतावं लागलं आहे.
गिल आऊट होता का?
तर झाले असे की, या सामन्यात गुजरात टायटन्स संघाची फलंदाजी सुरू असताना १३ वे षटक टाकण्यासाठी झीशान अन्सारी गोलंदाजीला आला. या षटकातील शेवटच्या चेंडूवर बटलरने शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने शॉट मारला. त्यावेळी गिलने एक धाव घेण्याचा प्रयत्न केला. गिल जोरात धावला मात्र,हर्षल पटेलने चेंडू उचलला आणि वेगाने यष्टिरक्षकाच्या दिशेने फेकला.
चेंडू यष्टीला जाऊन लागला. पण हा निर्णय देण्यासाठी थर्ड अंपायरने बराच वेळ घेतला. कारण ज्यावेळी चेंडू यष्टीला जाऊन लागला त्याचवेळी हेनरीक क्लासेनचा हात यष्टीला जाऊन लागल्याचं दिसत होतं. त्यामुळे अंपायरने बराच वेळ घेतला आणि शेवटी निर्णय सनरायझर्स हैदराबादच्या बाजूने दिला. दुसऱ्या एका अँगलने हेनरीक क्लासेनचा हात आधी स्टंपला लागल्याचं दिसून येत होतं. मात्र, अंपायरने त्याला बाद घोषित केलं.
गिल अंपायरवर भडकला
समालोचकांच्या मते, अंपायरने दिलेला निर्णय योग्य होता. कारण आधी चेंडू स्टंपला लागला त्यानंतर क्लासेनचा हात लागला. मात्र, गिल या निर्णयाला विरोध करताना दिसून आला. बाद होऊन ज्यावेळी तो मैदानाबाहेर गेला. त्यावेळी तो अंपायरला जाब विचारताना दिसून आला. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की तो अंपायरवर संताप व्यक्त करताना दिसून येत आहे. त्याचे हातवारे पाहून तो अंपायरला, तुम्हाला दिसत नाही का? असं विचारताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
गुजरातने उभारला २२४ धावांचा डोंगर
या सामन्यात सनरायझर्स हैदाराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या गुजरात टायटन्सकडून शुबमन गिल आणि साई सुदर्शनने दमदार सुरूवात करून दिली. साई सुदर्शनने ४८ धावांची खेळी केली. तर गिल ७६ धावांवर माघारी परतला. शेवटी जोस बटलरने ६४ धावा करत संघाची धावसंख्या २०० पार पोहोचवली.