LSG vs SRH IPL 2025 Highlights in Marathi: आयपीएल २०२५ मधून लखनौ सुपर जायंट्सचा संघ बाहेर पडला आहे. लखनौच्या मैदानावर झालेल्या सामन्यात हैदराबादने लखनौचा सहज ६ विकेट्सने पराभव केला आणि २०६ धावांचे लक्ष्य १० चेंडू शिल्लक ठेवत गाठलं. या पराभवासह लखनौचं प्लेऑफचं स्वप्न सलग दुसऱ्या वर्षी भंगलं आहे.

सनरायझर्स हैदराबादने २०६ धावांचे लक्ष्य गाठले आणि हंगामातील त्यांचा चौथा विजय मिळवला. या पराभवामुळे लखनौ सुपर जायंट्सच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या सर्व शक्यता संपुष्टात आल्या आणि त्यांना स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. या हंगामातील लखनौचा हा ७ वा पराभव आहे.

सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनौ सुपर जायंट्सने २० षटकांत ७ गडी गमावून २०५ धावा केल्या. मिचेल मार्श आणि एडन माक्ररम यांनी पहिल्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी केली. मिचेल मार्शने ६५ धावा आणि एडन मारक्रमने ६१ धावांची खेळी केली.

निकोलस पूरनला या सामन्यात सूर गवसला. त्याने १७३.०७ च्या स्ट्राईक रेटने २६ चेंडूत ४५ धावा केल्या. पण मधल्या षटकांमध्ये, सनरायझर्सच्या गोलंदाजांनी नियमित अंतराने विकेट घेत त्यांच्या धावांवर ब्रेक लावला. इशान मलिंगा हा सनरायझर्स हैदराबादचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ४ षटकांत २८ धावा देत २ विकेट्स घेतले. तर हर्ष दुबे, हर्षल पटेल आणि नितीश कुमार रेड्डी यांनी १-१ विकेट घेतली.

प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादने आक्रमक सुरुवात केली. अभिषेक शर्माने २० चेंडूत ५९ धावांची तुफानी खेळी केली आणि सुरुवातीलाच सामना हैदराबादच्या बाजूने वळवला. इशान किशनसह त्याने पॉवरप्लेमध्ये वेगाने धावा केल्या. पण, दिग्वेश राठीने आठव्या षटकात अभिषेकला बाद करून लखनौला काहीसा दिलासा दिला. असे असूनही, सनरायझर्सच्या फलंदाजांनी दबाव कायम ठेवला आणि लक्ष्य सहज गाठले.

इशान किशनने २८ चेंडूत ३५ धावांचे योगदान दिले. दरम्यान, हेनरिक क्लासेन (४७ धावा) आणि कामिंदू मेंडिस (३२ धावा) यांनी संघाला विजय मिळवून दिला. ज्यामुळे हैदराबादने हा सामना ६ विकेट्सने जिंकला.

लखनौ सुपर जायंट्ससाठी हा हंगाम आव्हानात्मक होता. ऋषभ पंत आणि डेव्हिड मिलर यांच्या खराब फॉर्मचा संघाला चांगलाच फटका बसला. त्याच वेळी, हंगामाच्या चांगल्या सुरुवातीनंतर निकोलस पूरनलाही काही खास कामगिरी करता आली नाही. यानंतर आता लखनौचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाल्याने मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सचा संघ नॉकआऊट सामना खेळणार आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल तो प्लेऑफसाठी पात्र ठरेल.