वेस्ट इंडिजचा जादूई फिरकी गोलंदाज सुनील नरिनवर संशयास्पद गोलंदाजीच्या शैलीचा पुन्हा ठपका ठेवण्यात आला आहे. बुधवारी कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्याप्रसंगी त्याची गोलंदाजी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
रिचर्ड इलिंगवर्थ आणि विनीत कुलकर्णी या दोन मैदानावरील पंचांनी नरिनची गोलंदाजीची शैली संशयास्पद असल्याचे अहवालात नमूद केले आहे. त्याच्या काही चेंडूंबाबत हे आक्षेप नोंदवण्यात आले आहेत, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव अनुराग ठाकूर यांनी दिली आहे.
‘‘आयपीएलच्या संशयास्पद गोलंदाजीच्या शैलीबाबतच्या धोरणानुसार, नरिन पुढील सामन्यांमध्येसुद्धा गोलंदाजी करू शकेल. मात्र या दरम्यान आयसीसी आणि बीसीसीआयची मान्यता असलेल्या चेन्नईच्या श्री रामचंद्र आथ्रेस्कोपी अँड स्पोर्ट्स सायन्स सेंटरमध्ये गोलंदाजीच्या शैलीची चाचणी द्यावी लागेल,’’ असे ठाकूर यांनी सांगितले.
नरिनचा ‘दूसरा’ आणि ‘कॅरम बॉल’ पद्धतीने चेंडू टाकण्याची शैली वादग्रस्त ठरू शकते. आयसीसीच्या नियमानुसार नरिनकडून दुसऱ्यांदा ही चूक घडल्यास त्याच्यावर एका वर्षांसाठी बंदी येऊ शकते.