SRH beat RCB by 25 runs :आयपीएलच्या १७व्या हंगामातील ३०वा सामना बंगळुरुच्या एम चिन्नास्वामीच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने आले होते. ज्यामध्ये सनरायझर्स हैदराबादने रेकॉर्डब्रेक कामगिरी करताना आरसीबीवर २५ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने ट्रेव्हिस हेडच्या शतकी खेळीच्या जोरावर विक्रमी २८७ धावा केल्या होत्या. मात्र, प्रत्युत्तरात आरसीबीचा संघ ७ बाद २६२ धावाच करु शकला. आरसीबीकडून दिनेश कार्तिकने सर्वाधिक ८३ धावांचे योगदान दिले.

हैदराबाद आणि बंगळुरुने ५४९ धावांचा पाऊस पाडला –

कर्णधार फाफ डु प्लेसिस आणि दिनेश कार्तिक यांच्या शानदार खेळीनंतरही आरसीबी संघ सनरायझर्स हैदराबादविरुद्ध विजय नोंदवू शकला नाही. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने ट्रॅव्हिस हेडचे शतक आणि हेनरिक क्लासेनच्या अर्धशतकाच्या जोरावर २० षटकांत ३ बाद २८७ धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात मोठी धावसंख्या ठरली. प्रत्युत्तरात आरसीबीनेही शानदार फलंदाजी केली, परंतु लक्ष्य इतके मोठे होते की संघ २५ धावांनी मागे राहिला. आरसीबीला २० षटकात ७ विकेट्सवर केवळ २६२ धावा करता आल्या. दोन्ही संघांमधील या सामन्यात एकूण ५४९ धावा झाल्या. सनरायझर्स हैदराबादकडून कर्णधार पॅट कमिन्सने ४३ धावांत तीन विकेट्स घेतल्या.

दिनेश कार्तिकची झुंज व्यर्थ –

दिनेश कार्तिकने ३५ चेंडूत ५ चौकार आणि ७ षटकार मारत ८३ धावांची धाडसी खेळी खेळून आरसीबीला अनपेक्षित विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला यश आले नाही. हा हंगाम आरसीबीसाठी चांगला राहिला नाही आणि संघाला सातपैकी केवळ एकच सामना जिंकता आला आहे. या सामन्यात कार्तिकने यंदाच्या हंगामातील १०८ मीटरचा सर्वात लांब षटकार मारला. आरसीबीचा हा सलग पाचवा पराभव असून गुणतालिकेत ते तळाच्या १०व्या स्थानावर कायम आहे. त्याचबरोबर या शानदार विजयासह हैदराबादचा संघ आठ गुणांसह चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. हैदराबादने या मोसमात आतापर्यंत सहापैकी चार सामने जिंकले आहेत, तर दोन सामने गमावले आहेत.

हेही वाचा – IPL 2024 : चेन्नईसाठी आनंदाची बातमी, पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी ‘या’ खेळाडूला बोर्डाकडून मिळाली सुट्टी

आरसीबीच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण –

आरसीबीच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण म्हणजे या संघाची खराब गोलंदाजी राहिली. या मोसमात आरसीबीची गोलंदाजी कमकुवत दिसून आली नाही. या सामन्यात सिराजला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवण्यात आले होते आणि त्याच्या जागी लॉकी फर्ग्युसनला आणण्यात आले होते, मात्र या सामन्यात त्याने ४ षटकात ५२ धावा देत २ विकेट्स घेतल्या. विल जॅकने ३ षटकांत ३२ धावा दिल्या तर रिस टोपलीने ४ षटकांत ६८ धावा दिल्या.

हेही वाचा – MI vs CSK : रोहित शर्माच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद, ‘या’ बाबतीत ठरला तिसरा खेळाडू

कहाणी इथेच संपली नाही, यश दयालने ४ षटकात ५१ धावा दिल्या तर विजय कुमारने ४ षटकात ६४ धावा दिल्या. महिपाल लोमररने एक षटक टाकून १८ धावा दिल्या. या सामन्यात आरसीबीच्या प्रत्येक गोलंदाजाने १३ पेक्षा जास्त इकॉनॉमी रेटने धावा दिल्या. या सामन्यात आरसीबीचे गोलंदाज पहिल्या डावात कोणत्याही वेळी हैदराबादच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवू शकले नाहीत आणि दडपणाखाली पूर्णपणे विखुरलेले दिसले. हैदराबादच्या फलंदाजांनी आरसीबीच्या गोलंदाजीवर दमदार फटकेबाजी केली आणि त्यांना वर्चस्व गाजवण्याची संधी दिली नाही. या कमकुवत आक्रमणाच्या जोरावर आरसीबी या मोसमात अधिक चांगली कामगिरी करण्याची शक्यता कमी आहे.