Rohit Sharma’s reaction about MS Dhoni and Dinesh Karthik : सध्या आयपीएल २०२४ मध्ये टीम इंडियाचा सध्याचा कर्णधार रोहित शर्मापासून टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीपर्यंत सर्वच जण अप्रतिम कामगिरी करत आहेत. हे दोन्ही खेळाडू आपल्या स्फोटक फलंदाजीने चाहत्यांचे मनोरंजन करत आहेत. आयपीएलनंतर टीम इंडियाला आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धा खेळण्यासाठी जाणार आहे. त्याबाबत लवकरच टीम इंडियाची घोषणाही केली जाऊ शकते. याआधी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने एमएस धोनी आणि दिनेश कार्तिकबद्दल मोठी गोष्ट सांगितली आहे.

धोनी विश्वचषकासाठी अमेरिकेला येणार आहे का?

क्लब फायर पॉडकास्टमध्ये ॲडम गिलख्रिस्ट आणि मायकेल वॉन यांच्याशी संवाद साधताना रोहित शर्मा म्हणाला की, “एमएस धोनी आणि दिनेश कार्तिक या हंगामात, ज्या प्रकारे फलंदाजी करत आहेत त्याने मी खूप प्रभावित झालो आहे. धोनीने शेवटच्या सामन्यात फक्त ४ चेंडू खेळले आणि २० धावा केल्या आणि जबरदस्त प्रभाव पाडला. मात्र, धोनीला दुखापत झाल्यामुळे वेस्ट इंडिजमध्ये येण्यासाठी त्याला मनवणे कठीण जाईल. मात्र, तो अमेरिकेत येत असला, तरी तो गोल्फ खेळायला येणार आहे. याशिवाय, दिनेश कार्तिकला वेस्ट इंडिजमध्ये येण्यासाठी मनवणे सोपे जाईल, असे मला वाटते.”

दिनेश कार्तिकच्या फलंदाजीने रोहित प्रभावित –

आरसीबीचा यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक आयपीएल २०२४ मध्ये अप्रतिम फलंदाजी करत आहे आणि फिनिशरची भूमिका उत्तम बजावत आहे. दिनेशने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ज्याप्रकारे शानदार फलंदाजी केली, त्यावरून २०२४ च्या टी-२० विश्वचषकासाठी टीम इंडियामध्ये त्याचा समावेश करण्याची मागणी होत आहे. दिनेश कार्तिकच्या कामगिरीने प्रभावित झालेल्या रोहितने सांगितले की, दिनेश कार्तिक हा टी-२० विश्वचषकासाठी खूप चांगला पर्याय असू शकतो. रोहित शर्माच्या या वक्तव्यावरून बीसीसीआयचे निवडकर्ते दिनेश कार्तिकच्या नावावर चर्चा करू शकतात असे दिसते. कारण दिनेशचा अलीकडचा फॉर्म खूपच उत्कृष्ट आहे आणि त्याला अनुभवही खूप आहे.

हेही वाचा – IPL 2024 : “त्याच्या उपस्थितीचा मुंबईला फायदा झाला नसेल, पण…”, हार्दिक पंड्याबाबत माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

धोनीची शेवटची आयपीएल –

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ दरम्यान धोनीने टीम इंडियासाठी मेंटॉरची भूमिका बजावली होती. या विश्वचषकात टीम इंडियाचे कर्णधारपद विराट कोहलीच्या हातात होते. धोनीने आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपदही सोडले असून तो ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळाडू म्हणून आयपीएल खेळत आहे. असे मानले जाते की एमएस धोनीचा हा शेवटचा आयपीएल हंगाम असू शकतो, परंतु वयाच्या ४२ व्या वर्षीही एमएस धोनीने अप्रतिम फिटनेस राखला आहे.