Rohit Sharma On Mumbai Indians Captaincy: “पहिली मॅच देवाला” वाहणारा संघ म्हणजे मुंबई इंडियन्स असं पूर्वी चाहते गमतीत म्हणायचे, हळूहळू एमआयच्या संघाची ही ओळखही झाली, थोडक्यात आयपीएलचे सुरुवातीचे सामने संथ गतीने खेळण्यासाठी रोहित शर्माचा संघ ओळखला जात होताच. पण यंदा कर्णधार पदाची जबाबदारी पांड्याकडे जाताच पहिलीच मॅच नव्हे तर सहापैकी चक्क ४ सामन्यांवर मुंबईच्या संघाला पाणी सोडावे लागले आहे. आयपीएलची गुणतालिका पाहिल्यास आता मुंबईचा संघ चार दुर्दैवी पराभव व दोन विजयांसह शेवटून दुसऱ्या क्रमांकावर आहे. यापूर्वीच्या हंगामांमध्ये मुंबई इंडियन्सच्या नावावर सुरुवातीला पराभव जास्त असले तरी कमबॅकही दमदार व्हायचा पण यावेळची चित्र जरा वेगळीच आहेत. यंदा पाच वेळा चषक जिंकून देणाऱ्या रोहित शर्माकडे कर्णधारपद नसल्याने स्थिती खरंच बदलेल का याविषयी टीम एमआयचे चाहते सुद्धा साशंक आहेत.
गेल्या १० वर्षांत प्रशिक्षक बदलले पण कर्णधार बदलला नाही- रोहित शर्मा
अलीकडेच क्लब प्रेरी फायर पॉडकास्टवर रोहितला आयपीएलमधील एमआयच्या खराब सुरुवातीच्या व दमदार कमबॅकच्या परंपरेविषयी विचारण्यात आले तेव्हा त्यानं याविषयी आपला अनुभव सांगितला आहे. रोहित शर्मा सांगतो की, “गेल्या १० वर्षांपासून सपोर्ट स्टाफसह मिळून काम करण्याची परंपरा आम्ही तयार केली आहे त्यामुळे संघाला कठीण परिस्थितीतून परत बाहेर येण्यास मदत झाली आहे. ही मुंबई इंडियन्सची सवय आहे, जिथे आम्ही हळू सुरुवात करतो आणि नंतर गोष्टी बदलू लागतात.”
२०१३ ते २०२३ या कालावधीत मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणाऱ्या रोहितने सांगितले की, “गेल्या १० वर्षांपासून कर्णधारपद स्थिर होते. प्रशिक्षक बदलले आहेत पण कर्णधार बदलला नव्हता. माझ्या डोक्यात काही विचार होते. खरंतर संघात जे नवीन लोक येतात त्यांनी एकदा माझ्या विचारांना फॉलो करून पाहायला हवं असंही मला वाटत होतं. मला माहित आहे की आयपीएल कसं खेळायचं, एक यशस्वी संघ कसा बनवावा हे मी जाणतो. अर्थात प्रत्येकाला माझा विचार पटवून देण्यासाठी आणि त्यांनी आजवर जे केलेलं नाही करायला लावण्यासाठी वेळ हा लागतोच.”
मिचेल जॉन्सनला वानखेडेवरील गोलंदाजीसाठी तयार करताना..
यालाच जोडून एक उदाहरण देताना रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनला वानखेडेवर गोलंदाजी करताना बॉल अधिकाधिक स्विंग करण्यासाठी कसे तयार करावे लागले हे सांगितलं. रोहित सांगतो की, “मला वानखेडे स्टेडियम माहित आहे. मी तिथे मोठा झालो आहे. मला माहित आहे की तिथे काय काम करते, तुम्हाला काय करण्याची आवश्यकता आहे… उदाहरणार्थ, मिचेल जॉन्सन, आपल्याला सर्वांना माहित आहे की त्याला वेगवान गोलंदाजी आवडते पण वानखेडेमध्ये कदाचित बॉल हलकेच टाकून तो अधिक स्विंग कसा होईल याचा प्रयत्न करणं गरजेचं असतं. आता हा वेगळा प्रयोग करण्यासाठी त्याच्याशी बोलणं आवश्यक होतं. “
हे एकट्याचं कामच नाही- रोहित शर्मा
दरम्यान याच पॉडकास्टमध्ये रोहितने MI मध्ये त्याच्या प्रवासात मदत केल्याबद्दल सर्व प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचे देखील आभार मानले होते. रोहित म्हणाला की, “जेव्हा मी पदभार स्वीकारला आणि त्यानंतर गेल्या वर्षी जेव्हा मी कर्णधार होतो तेव्हापर्यंत प्रत्येकाने मला मदत केलीये. हे एका व्यक्तीचं काम नाही हे आम्हा सर्वांना समजले आहे. आमचे विचार जुळवून घेण्यासाठी मला ]सपोर्ट स्टाफच्या पाठिंब्याची गरज होतीच आणि आहेच. पाँटिंगपासून ते जयवर्धने ते आता मार्क बाउचर, सर्वांनी खूप पाठिंबा दिला आहे.”