Tilak Varma Breaks Silence on Being Retired Out: आयपीएल २०२५ मध्ये मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा १२ धावांनी पराभव करत दणदणीत विजयाची नोंद केली आणि पुनरागमनाचा डंका वाजवला. या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून मधल्या फळीतील फलंदाज तिलक वर्माने शानदार खेळी केली. तिलकने ३३ चेंडूत ६ चौकार आणि तीन षटकारांसह ५९ धावांची खेळी केली. तिलकच्या या खेळीमुळे मुंबई संघ दिल्लीसमोर २०६ धावांचे लक्ष्य ठेवण्यात यशस्वी झाला. पण तिलक वर्मा यंदाच्या मोसमात रिटायर्ड आऊट झाल्यामुळे चर्चेत होता. मुंबई इंडियन्सचा सामना आज १७ एप्रिलला सनरायझर्स हैदराबाद संघाशी होणार आहे.

तिलक वर्मा यंदाच्या आयपीएल हंगामात तेव्हा चर्चेत आला जेव्हा संघ व्यवस्थापनाने लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) विरुद्धच्या सामन्यात त्याला रिटायर्ड आऊट करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी तिलक २३ चेंडूत २५ धावा काढून खेळत होता. तिलकच्या जागी मिचेल सँटनरला फलंदाजीसाठी पाठवण्यात आले, परंतु सँटनर आणि कर्णधार हार्दिक पंड्या चमत्कार करू शकले नाहीत.

दरम्यान मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सविरुद्धचा तो सामना १२ धावांनी गमावला. त्या सामन्यानंतर, तिलक वर्मा उत्तम फॉर्ममध्ये आला आहे. दिल्ली कॅपिटल्सविरूद्धच्या सामन्यापूर्वी, त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात अर्धशतक (५६ धावा) देखील केले होते.

आता तिलक वर्माने रिटायर्ड आऊट होण्याबद्दल आपले मौन सोडले आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयानंतर, तिलक वर्माने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध रिटायर्ड आऊट झाल्यानंतर काय वाटलं ते सांगितलं. तिलक म्हणाला की, त्याला फक्त असं वाटत होतं की हा निर्णय संघाच्या हितासाठी घेण्यात आला आहे.

तिलक वर्मा स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाला, “काहीच नाही. मला वाटत होतं की त्यांनी संघाच्या हितासाठी हा निर्णय घेतला आहे. म्हणून, मी तो सकारात्मकतेने स्वीकारला आणि त्याबद्दल नकारात्मक विचार केला नाही. तुम्ही या गोष्टी कशा हाताळता हे महत्त्वाचं आहे. हेच जास्त महत्वाचं आहे.”

तिलक वर्मा पुढे म्हणाला, “म्हणूनच मी असा विचार करत होतो. मी जिथे फलंदाजी करतो तिथे मला फक्त सहजतेने फलंदाजी करायची आहे. म्हणून मी प्रशिक्षक आणि कोचिंग स्टाफला सांगितलं की त्यांना जिथे हवं तिथे मला खेळवा. काळजी करू नका. मी माझी सर्वोत्तम कामगिरी करेन.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिलक वर्मा सध्या आयपीएल २०२५ मध्ये मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिलकने ५ डावात ४२.०० च्या सरासरीने २१० धावा केल्या आहेत. चालू हंगामात, सूर्यकुमार यादवने मुंबई इंडियन्ससाठी तिलकपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. सूर्यकुमारने ६ डावांमध्ये ४७.८० च्या सरासरीने २३९ धावा केल्या आहेत.