पंजाब किंग्जने आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात श्रेयस अय्यरला २६.७५ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिलं होतं. पंजाब किंग्जचा हा निर्णय योग्य ठरला. श्रेयसला संघात घेतल्यानंतर, पंजाबने आणखी एक मोठा निर्णय घेतला. मुख्य प्रशिक्षक म्हणून रिकी पाँटींगची संघात एन्ट्री झाली. श्रेयस आणि रिकी पाँटींगच्या जोडीने दिल्ली कॅपिटल्स संघाला अंतिम फेरीत पोहोचवलं होतं. त्यामुळे ही जोडी पंजाब किंग्ज संघासाठी देखील फायदेशीर ठरणार असा अंदाज होता आणि झालंही तसंच. संपूर्ण हंगामात हा संघ चॅम्पियनसारखा खेळला. आता पंजाब किंग्जने आयपीएल २०२५ स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यादरम्यान रिकी पाँटींगने दिलेला एक सल्ला पंजाब किंग्जला कामी आला.
पंजाब किंग्ज संघाला रिकी पाँटींगने दिलेला सल्ला कामी आला
श्रेयस अय्यर हा सलग वर्षांत २ फ्रँचायझींना आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचवणारा पहिलाच कर्णधार ठरला आहे. याआधी कुठल्याही कर्णधाराला असा कारनामा करता आलेला नाही. पंजाब किंग्ज संघात आत्मविश्वास निर्माण करण्यात रिकी पाँटींगने मोलाची भूमिका बजावली. ज्यावेळी सर्व खेळाडू पहिल्यांदा भेटले होते, त्यावेळी रिकी पाँटींगने संपूर्ण संघाला मोलाचा सल्ला दिला होता.
क्वालिफायर १ मध्ये आपले स्थान निश्चित केल्यानंतर पंजाबचा स्टार फलंदाज शशांक सिंगने रिकी पाँटींगबाबत मोठा खुलासा केला होता. शशांक म्हणाला, ” पहिल्या दिवशी ज्यावेळी आम्ही भेटलो, त्यावेळी रिकी पाँटींग आणि श्रेयस अय्यरने सांगितले की ते आम्हाला सर्वांना समान वागणूक देतील. मग तो आपल्या संघातील अनुभवी गोलंदाज युजवेंद्र चहल असो की आपला बस ड्रायव्हर असो. सर्व खेळाडूंनी यावर ठाम राहून सर्वांना आदर दिला. जो संघाबद्दल बरंच काही सांगून जातो.”
तसेच तो पुढे म्हणाला, “रिकी पाँटींगने संघाची संस्कृती आणि मानसिकता बदलली आहे. याचं सर्व श्रेय त्याला जातं. त्यांच्यामुळे आमचा खेळाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. ड्रेसिंग रूममध्ये चांगलं वातावरण कसं निर्माण होईल, याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली.” याचा पंजाब किंग्ज संघाला चांगलाच फायदा झाला.
पंजाबचा दमदार विजय
आयपीएल २०२५ स्पर्धेतील क्वालिफायर २ चा सामना मुंबई इंडियन्स विरूद्ध पंजाब किंग्ज असा रंगला. या सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने २०३ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करताना पंजाब किंग्ज संघाकडून कर्णधार श्रेयस अय्यरने दमदार खेळी केली. पंजाबने हा सामना ५ गडी राखून जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पंजाबचा सामना आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरूद्ध होणार आहे.