Venkatesh Iyer Trolled: यंदाच्या आयपीएलच्या मेगा लिलावात २३.७५ कोटी रुपयांना खरेदी करण्यात आलेला कोलकाता नाईट रायडर्सचा फलंदाज वेंकटेश अय्यर मंगळवारी झालेल्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला. वेंकटेशच्या किमतीमुळे तो केकेआरचा एक महत्त्वाचा खेळाडू बनला होता पण या वर्षीच्या स्पर्धेत तो आतापर्यंत खूपच निराशाजनक कामगिरी करत आहे.
दिल्लीविरुद्धच्या सामन्यापूर्वी त्याने ९ सामन्यांमध्ये फक्त १३५ धावा केल्या होत्या आणि मंगळवारी त्याला अक्षर पटेलने फक्त ७ धावांवर बाद केले. यानंतर सोशल मीडिया युजर्स आणि कोलकाता नाइट रायडर्सच्या चाहत्यांनी व्यकंटेशच्या निराशाजनक कामगिरीवर संताप व्यक्त केला.
व्यंकटेशच्या खेळीवर नाराजी व्यक्त करताना कोलकाता नाइट रायडर्सच्या एका चाहत्याने, “व्यंकटेश अय्यर हा २३.७५ कोटी रुपयांच्या स्कॅमपेक्षा कमी नाही. बेफिकीर आणि कणा नसलेल्या या खेळाडूने संपूर्ण हंगामात केकेआरला अडचणीत आणले आहे. आता ही फसवणूक सोडून देण्याची वेळ आली आहे”, असे म्हटले आहे.
या दरम्यान कोलकात्याच्या दुसऱ्या एका चाहत्याने म्हटले की, “व्यंकटेश अय्यर, मी तुझ्यावर निराश झालो आहे. तू या संघाचा कमकुवत दुवा आहेस. बघा ते किती छान सेटअप झाले होते आणि तू ते उद्ध्वस्त केले.”
दरम्यान, आयपीएल २०२४ मध्ये, अय्यर हा केकेआरच्या जेतेपदाच्या विजयाच्या प्रमुख शिल्पकारांपैकी एक होता. त्याने १५ सामन्यांमध्ये ४६.२५ च्या उत्कृष्ट सरासरीने आणि १५८ च्या जबरदस्त स्ट्राईक रेटने ३७० धावा केल्या होत्या. यामध्ये त्याने चार अर्धशतके केली होती. या अर्धशतकांमध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या क्वालिफायर १ आणि फायनलमध्ये सामन्याला दिशा देणाऱ्या डावांचा समावेश होता.
आयपीएल २०२५ च्या ४८ व्या सामन्यात, कोलकाता नाईट रायडर्सने मंगळवारी (२९ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्सला १४ धावांनी पराभूत केले. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सने ८ वर्षांनंतर विजय मिळवला आहे. यापूर्वी त्यांनी येथे २०१७ मध्ये विजय मिळवला होता.
दिल्लीने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. कोलकाता नाईट रायडर्सने २० षटकांत ९ गडी गमावून २०४ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सने २० षटकांत ९ गडी गमावून १९० धावा केल्या.
दरम्यान दिल्ली कॅपिटल्स ९ सामन्यांत १२ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांना २ मे रोजी सनरायझर्स हैदराबादशी सामना करायचा आहे. तर, कोलकाता नाइट रायडर्सचे १० सामन्यांत ९ गुण झाले आहेत. ते ७ व्या क्रमांकावर आहे. १ मे रोजी त्यांचा सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे.