Virat Kohli needs 29 runs to complete 8000 runs in IPL : आयपीएल २०२४ मध्ये, २२ मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात एलिमिनेटर सामना खेळवला जाणार आहे, या हंगामात आरसीबीची सुरुवात खूपच खराब झाली होती. पहिल्या ८ सामन्यात संघाला फक्त एकच सामना जिंकता आला होता, पण यानंतर त्यांनी दमदार पुनरागमन केले आहे. आरसीबीला प्लेऑफ्समध्ये पोहोचवण्यात विराट कोहलीचे योगदा खूप महत्त्वाचे आहे. त्याने प्रत्येक सामन्यात संघासाठी धावांचा पाऊस पाडला आहे. त्यामुळे विराट हा आयपीएल २०२४ मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे आणि त्याच्या डोक्यावर ऑरेज कॅप आहे. आता एलिमिनेटर सामन्यात कोहली इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे.

विराट कोहलीला इतिहास रचण्याची संधी –

आयपीएलच्या सुरुवातीपासून विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळत आहे. कोहलीने अनेक वर्षे संघाचे नेतृत्वही केले आहे. आयपीएलच्या इतिहासात कोहलीने आतापर्यंत २५१ सामन्यांच्या २४३ डावांमध्ये ७९७१ धावा केल्या आहेत. सध्या कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. कोहली आता त्याच्या आठ हजार आयपीएल धावा पूर्ण करण्यापासून २९ धावा दूर आहे. एलिमिनेटर सामन्यात कोहलीने राजस्थान रॉयल्सविरुद्ध २९ धावा केल्या, तर तो आयपीएलमध्ये ८ हजार धावा करणारा पहिला फलंदाज ठरेल.आतापर्यंत कोणत्याही फलंदाजाला आयपीएलमध्ये ही कामगिरी करता आलेली नाही.

विराटला स्वत:चा विक्रम मोडण्याची संधी –

विराट कोहलीने आयपीएलमध्ये ८ शतके आणि ५० अर्धशतके झळकावली आहेत. याशिवाय नाबाद ११३ धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.आयपीएलच्या इतिहासात कोहलीने ७०२ चौकार आणि २७१ षटकार मारले आहेत. त्याचबरोबर विराट आता एका मोसमात सर्वाधिक धावांचा म्हणजेच ९७३ धावा करण्याचा स्वतःचा विक्रम मोडण्यापासून २६६ धावा दूर आहे. भारतीय फलंदाजाने हा विक्रम २०१६ मध्ये आपल्या नावावर केला होता. त्या हंगामात विराटने ४ शतके आणि ७ अर्धशतके झळकावली होती. विशेष म्हणजे आरसीबीने त्या वर्षी अंतिम फेरी गाठली होती, पण अंतिम फेरीत सनरायझर्स हैदराबादकडून पराभव पत्करावा लागला होता.

हेही वाचा – IPL 2024 : ‘आरसीबीने पैसा वाया घालवला…’, बंगळुरुच्या विजयानंतर यशच्या वडिलांचा टीकाकारांबद्दल खुलासा

विराट कोहलीची आयपीएल २०२४ मधील कामगिरी –

आयपीएल २०२४ मध्ये विराट कोहलीची बॅट धावांच्या बाबतीत आग ओकत आहे. यंदाच्या हंगामात विराट कोहलीने शतक झळकावले आहे. आतापर्यंत १४ सामन्यांत कोहलीने १५५ च्या स्ट्राईक रेटने ७०८ धावा केल्या आहेत. या कालावधीत कोहलीने ५९ चौकार आणि ३७ षटकार मारले आहेत. आता एलिमिनेटर सामन्यात कोहलीकडून संघाला अशाच शानदार कामगिरीची अपेक्षा असेल.