BCCI may drop 4 senior players after WTC Final 2025 : न्यूझीलंडने भारताविरुद्धची तीन सामन्यांची कसोटी मालिका ३-० अशी जिंकली. या लाजिरवाण्या पराभवामुळे चाहतेच नाही तर बीसीसीआयचे अधिकारीही संतापले आहेत. त्यामुळे बोर्डाने आता कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर टीम इंडियाच्या अनेक सीनियर खेळाडूंच्या कसोटी कारकिर्दीचा निर्णय ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होणार आहे. कारण भारताला २४ वर्षांनी पहिल्यांदाच मायदेशात ३-० अशा फरकाने मालिका गमवावी लागली आहे.

दोन खेळाडूंची कसोटी कारकीर्द संपणार?

पीटीआयच्या वृत्तानुसार, रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांच्या किमान दोन खेळाडूंसाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका शेवटची ठरण्याची दाट शक्यता आहे. हे चार खेळाडू त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार रोहित यांच्यात वृद्ध खेळाडूंसह संघ पुढे जाण्याबाबत अनौपचारिक चर्चा होऊ शकते.

टीम इंडियाच्या पराभवाचे केले जाणार मूल्यमापन –

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “निश्चितपणे संघाचे मूल्यांकन केले जाईल आणि ते अनौपचारिक असू शकते. कारण संघ १० नोव्हेंबरला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. हा एक मोठा पराभव आहे, पण ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका जवळ आली आहे आणि संघ आधीच जाहीर झाला आहे. त्यामुळे आत्ता संघात कोणतीही बदल केला जाणार नाही. मात्र जर भारत इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या डब्ल्यूटीसी फायनलसाठी पात्र ठरला नाही, तर या चारपैकी काही नावे इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत नसण्याची दाट शक्यता आहे. या चौघांनी घरच्या मैदानावर आपला शेवटचा कसोटी सामना एकत्र खेळला असावा.”

हेही वाचा – IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर एबी डिव्हिलियर्सने उपस्थित केले प्रश्न; म्हणाला, ‘सत्य हे आहे की…’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या कसोटी चॅम्पियनशिप सायकलमध्ये भारताने एकूण १४ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये संघाने ८ सामने जिंकले, ५ गमावले आणि एक सामना अनिर्णित राहिला. कसोटी मालिकेत भारताचा ३-० असा पराभव केल्यानंतर न्यूझीलंड संघ आता गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. किवी संघाने ११ पैकी ६ सामने जिंकले असून ५ सामने गमावले असून या संघाची विजयाची टक्केवारी ५४.५५ आहे. श्रीलंकेचा संघ ५५.५६ च्या विजयाच्या टक्केवारीसह तिसऱ्या स्थानावर आहे. पण भारतीय संघ अजूनही डब्ल्यूटीसी फायनलच्या शर्यत कायम आहे.