RCB Virat Kohli IPL 202 Trophy Winning Moment Video: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इ साला कप नमदू म्हणत आयपीएल ट्रॉफीचे जेतेपद अखेरीस आपल्या नावे केले आहे. आरसीबीने पंजाब किंग्सचा फायनलमध्ये ६ धावांनी पराभव करत मोठ्या प्रतिक्षेनंतर ट्रॉफीवर नाव कोरलं. विराट कोहली मैदानातच लहान मुलांसारखा ओक्साबोक्शी रडताना दिसला. तर इतर सर्व खेळाडू सेलिब्रेट करताना दिसले. दरम्यान ट्रॉफी घेतानाचा संघाचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
विराट कोहली आणि संघाच्या सर्व फलंदाजांच्या योगदानासह आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना १९० धावांचा पल्ला गाठला. यानंतर गोलंदाजीत कृणाल पंड्याने कमालीची स्पेल टाकत २ विकेट घेत सामन्याचा रोख बदलला. तर भुवनेश्वर कुमार आणि इतर गोलंदाजांच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर संघाने पंजाबवर मात करत विजय आपल्या नावे केला.
आरसीबीच्या अंतिम सामन्यासाठी आरसीबीचे अनेक आजी माजी खेळाडू मैदानात उपस्थित होते. ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स देखील खास सामना पाहण्यासाठी उपस्थित होते. दरम्यान तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत दुखापतीमुळे बाहेर झालेला देवदत्त पडिक्कल देखील अंतिम सामन्यासाठी उपस्थित होता. दरम्यान ट्रॉफी घेतानाचा स्टेजवरील एक प्रसंग लक्ष वेधून घेत आहे.
आरसीबीचा आयपीएल चॅम्पियन कर्णधार रजत पाटीदारला आयसीसीचे अध्यक्ष जय शाह आणि बीसीसीआयचे अध्यक्ष देवजीत सैकिया यांनी ट्रॉफी दिली. यानंतर संपूर्ण संघ सेलिब्रेशनसाठी स्टेजवर आला. यानंतर संघाने ट्रॉफी उंचावत भन्नाट सेलिब्रेशन केलं. त्यानंतर कर्णधार रजत पाटीदारने ट्रॉफी विराट कोहलीच्या हातात दिली.
विराट कोहलीने ट्रॉफी हातात घेत ट्रॉफीला किस दिली. त्यानंतर त्याने ट्रॉफी उंचावत सेलिब्रेशन केलं. तितक्यात संघ जल्लोष करत असताना अनेक कागदाचे तुकडे मशीनमधून मागून उडवण्यात येत होते. त्यातील एक कागदाचा तुकडा येऊन विराट कोहलीच्या डोळ्यावर बसला. विराट जल्लोषात मग्न असल्याने तो कागदही तसाच त्याच्या डोळ्यावर होता.
विराट कोहलीच्या हातात असलेली ट्रॉफी तो उंचावत असताना तितक्यात देवदत्त पडिक्कल त्याच्या बाजूला उभा होता. पडिक्कलने त्याच्या डोळ्यावर कागदाचा तुकडा पाहिला आणि पटकन हाताने बाजूला केला. पडिक्कलची ही कृती पाहून सर्वच त्याचं कौतुक करत आहेत. यानंतर पडिक्कल विराट आणि संपूर्ण संघ जल्लोषात मग्न झाले.
आरसीबीने ट्रॉफीबरोबर आणि चॅम्पियन टॅगबरोबर ग्रुप फोटो काढला, ज्यामध्ये विराट ट्रॉफीच्या बाजूला बसून जल्लोष करत होता. त्यानंतर संपूर्ण आरसीबीचा सपोर्ट स्टाफ, कोच आणि कुटुंबीयांनीदेखील फोटो क्लिक केला. यानंतर संपूर्ण अहमदाबाद स्टेडियममध्ये ट्रॉफीसह विक्ट्री लॅप काढला. यानंतर संपूर्ण संघ दुसऱ्या दिवशी म्हणजेच उद्या बंगळुरूसाठी रवाना होईल आणि विजयाचा आनंद तिथे साजरा करणार आहे.