भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी विराट कोहलीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा (RCB) कर्णधार बदलल्याने इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) विराट कोहलीचा खेळ २०१६ च्या हंगामाप्रमाणे दिसू शकते, असा विश्वास गावस्कर यांनी व्यक्त केला आहे.

IPL २०१६ मध्ये विराट कोहलीने ९०० पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. आयपीएलचे अधिकृत प्रसारक स्टार स्पोर्ट्सच्या ‘गेमप्लान’ या एपिसोडमध्ये सुनील गावसकर म्हणाले, ‘कोहली पुन्हा कर्णधारपदाची धुरा सांभाळेल की नाही, हे सध्या आम्हाला माहीत नाही. पण कधीकधी जेव्हा एखादा खेळाडू कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त होतो तेव्हा तो इतर १० खेळाडूंचा विचार करत नसल्यामुळे चांगली कामगिरी करतो.

सुनील गावसकर म्हणाले, “जेव्हा तुम्ही कर्णधार असता तेव्हा तुम्ही इतर १० खेळाडूंचाही विचार करता. तुम्ही कर्णधार असताना इतर खेळाडूंच्या चांगल्या किंवा त्यांच्या खराब फॉर्मबद्दल विचार करत आहात आणि ते कोणत्या गोष्टी बरोबर करत नाहीत, कोणत्या गोष्टी संघासाठी चांगल्या ठरतील, असा विचार करतो. या सीझनमध्ये आपण २०१६ च्या सीझनच्या कोहलीला पाहू शकतो, ज्यामध्ये त्याने आयपीएलमध्ये जवळपास १००० धावा केल्या होत्या,” असं गावस्कर यांनी सांगितलं.

दरम्यान, नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर आज आयपीएलमध्ये आरसीबी पंजाब किंग्जविरुद्ध खेळणार आहे. गेल्या अनेक वर्षांनंतर आज पहिल्यांदाच विराट कर्णधार म्हणून नाही, तर एक खेळाडू म्हणून IPLचा सामना खेळेल. त्यामुळे विराटच्या चाहत्यांचं त्याच्या कामगिरीकडे लक्ष लागलंय.