Virendra Sehwag Lashes Out at Hardik Pandya: कोलकाताने केलेल्या पराभवानंतर मुंबईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. मुंबईने ११ सामन्यात आठ सामने गमावले आहेत आणि केवळ ३ सामने जिंकण्यात यश आले होते. हार्दिक पंड्याच्या नेतृत्त्वाखालील मुंबई इंडियन्सची कामगिरी यंदाच्या मोसमात फारच सुमार दर्जाची राहिली आहे. मुंबईच्या कामगिरीवर अनेक दिग्गजांनी खडे बोल सुनावले आहेत. पण सेहवागने तर मुंबईच्या संघातील सपोर्ट स्टाफ आणि कर्णधारावर कारवाई केली पाहिजे, असं मुंबईच्या संघ व्यवस्थापनाला सुचवलं आहे. त्याचसोबत खूपच तिखट शब्दात संघाच्या फलंदाजीवर वक्तव्य केले आहे.

सेहवागने क्रिकबझशी बोलताना पंड्याच्या फलंदाजी क्रमाकडे लक्ष वेधले. सेहवागने सांगितलं की, जेव्हा पंड्या गुजरात टायटन्स संघात खेळायचा तेव्हा तो नेहमी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरत असे. त्याचसोबत पंड्या आणि डेव्हिडसारखे खेळाडू फलंदाजीसाठी ७व्या आणि ८वया क्रमांकावर उतरतात, याबाबत आश्चर्य व्यक्त केले आणि फारच तिखट शब्दात त्यांचे कान टोचले. सेहवागने संघमालकांना गंभीर प्रश्न उपस्थित करण्याचे आवाहन केले आणि फलंदाजीच्या क्रमवारीतील अशा मो्ठ्या बदलांमागील स्पष्टीकरण मागितले पाहिजे असे सुचवले.

पंड्या आणि डेव्हिडच्या फलंदाजी क्रमाबद्दल बोलताना सेहवाग म्हणाला, हार्दिक पांड्या गुजरातचा कर्णधार असताना सातत्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत होता. मग मुंबई इंडियन्समध्ये आल्यावर काय झालं? अनुभवी खेळाडू इतक्या उशिरा आणि खालच्या फळीत फलंदाजीला येत आहेत हे पाहून मी हैराण आहे. संघ व्यवस्थापनाने खेळाडूंवर कठोर कारवाई करत त्यांना जाब विचारला पाहिजे की नेमकं काय चाललंय किंवा फलंदाजी क्रम का बदलला गेला आहे, याबद्दल खेळाडूंनी बोललं पाहिजे. संघाचा कर्णधार, फलंदाजी प्रशिक्षक, गोलंदाजी प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ सर्वांचीच इथे चूक आहे. संघमालकांनी कठोर भूमिका घेण्याची गरज आहे.

हार्दिक-डेव्हिड इतके वाईट खेळाडू आहेत का? – सेहवाग

पंड्या आणि डेव्हिडला उशिरा फलंदाजीला पाठवण्याबाबद बोलताना सेहवाग म्हणाला, केकेआरने आंद्रे रसेलला अखेरच्या षटकांसाठी वाचवून ठेवले पण तो फक्त दोन चेंडू खेळून बाद झाला. मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्या आणि टीम डेव्हिडला उशिरा फंलदाजीसाठी पाठवले. हे करून तुम्ही का साध्य केलं? बरेच चेंडू बाकी होते, आणि विकेटही पडले होते. तुम्ही एकतर लवकर फलंदाजीला यायला हवं होतं आणि सामना लवकर संपवायला हवा होता.

पुढे सेहवाग म्हणाला, मला कळतं नाहीय की धावांचा पाठलाग करताना यांना नेमकं काय होतं. हार्दिक सातव्या आणि डेव्हिड आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येतो. मला समजत नाही की ते नेमकं काय करतायत. ते (पंड्या आणि डेव्हिड) इतके वाईट खेळाडू आहेत का जर लवकर फलंदाजीसाठी आले तर आऊट होतील?”