आगामी टी-२० विश्वचषक २०२४ साठीच्या भारतीय संघात हार्दिक पंड्याला संधी मिळाली. विश्वचषकाचा संघ जाहीर होण्यापूर्वी हार्दिक हा भारताच्या टी-२० संघाचा भाग नसेल अशी चर्चा होती. त्याची आयपीएल साधारण कामगिरी आणि वाद पाहता तरीही त्याची भारतीय संघात निवड झाली. रोहित शर्माच्या जागी पांड्याला मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार बनवण्यात आले, त्यानंतर चाहत्यांनी हार्दिकवर नाराजी व्यक्त केली. हार्दिक आणि रोहितच्या संदर्भात अनेक गोष्टी समोर आल्या, पण जेव्हा टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आणि हार्दिकही टीममध्ये सामील झाला तेव्हा सर्वच चर्चांना पूर्णविराम मिळाला. यावर माजी क्रिकेटपटू मायकल क्लार्कने मोठे वक्तव्य केले आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कने टीम इंडियात हार्दिकच्या निवडीबाबत आपले मत व्यक्त केले. अराउंड द विकेट पॉडकास्टमध्ये क्लार्क म्हणाला, “रोहित शर्माला मी ओळखतो. हंगामाअखेर हार्दिकच्या खांद्यावर हात टाकून त्याची विचारपूस करेल. रोहित केवळ कर्णधार नाहीये, तो खऱ्या अर्थाने सगळ्यांची मोट बांधतो. त्याला भारतासाठी वर्ल्डकप जिंकायचा आहे.”
हेही वाचा- ‘काय हिरो, गार्डनमध्ये आला आहे का?’ तिलक वर्माचं उत्तर ऐकून रोहित शर्माच झाला चकित, VIDEO व्हायरल
पंड्याच्या संघातील निवडीबाबत क्लार्क म्हणाला, “रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्यामध्ये जर इतकेच मतभेद असते तर हार्दिकची टी-२० विश्वचषकाच्या भारतीय संघात निवडच झाली नसती. भारतीय कर्णधाराकडे इतकी ताकद आहे की त्याने हार्दिकची निवड होऊ दिली नसती.”
माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार पुढे बोलताना म्हणाला, “मुंबई इंडियन्सने रोहितला ज्या प्रकारे कर्णधारपदावरून काढले त्याबाबत काही मुद्दे असले तरी, मला वाटत नाही की त्याचा रोहित आणि हार्दिक यांच्यातील मैत्रीवर किंवा पंड्याच्या निवडीवर परिणाम झाला असेल. हार्दिकला माहित आहे की त्याला बॅट आणि बॉलने चांगली कामगिरी करावी लागेल, जोपर्यंत पंड्या त्याची सर्वोत्तम कामगिरी करत आहे, तोपर्यंत रोहितला माहित आहे हार्दिक पंड्या भारतीय संघासाठी किती महत्त्वाचा खेळाडू आहे.”