आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची निराशाजनक कामगिरी सुरु असून सोमवारी सनरायझर्स हैदराबादने बंगळुरुचा पराभव करत त्यांचे स्पर्धेतील जवळपास आव्हान संपुष्टात आणले. या पराभवानंतर विराट कोहलीनेही संघाच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली. आम्ही चांगला खेळ केला नाही. त्यामुळे आम्ही या सामन्यात पराभवासाठी पात्रच होतो, अशा शब्दात विराट कोहलीने नाराजी व्यक्त केली.

सोमवारी सनरायझर्स हैदराबादने बंगळुरुचा पाच धावांनी पराभव करत गुणतालिकेतील अव्वल स्थान कामय राखले. तर बंगळुरुचे आयपीएलमधील आव्हान जवळपास संपुष्टात आणले. पराभवानंतर विराट कोहलीने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, आम्ही चांगली कामगिरी केली नाही. त्यामुळे या पराभवासाठी आम्ही पात्र होतो. कॉलिन डी ग्रँडहोम आणि मनदीपने चांगल्या भागीदारीमुळे सामना जिंकता येतो हे दाखवले. त्या दोघांनी प्रयत्न केले, असे कोहलीने आवर्जून सांगितले. या खेळपट्टीवर फलंदाजी करणे काहीसे कठीण होते. गोलंदाजांनी चांगली सुरुवात करुन दिली, पण फलंदाज त्यांचा करुन फायदा घेण्यात अपयशी ठरले, असेही कोहलीने सांगितले. सनरायझर्स हा एक उत्तम संघ आहे. त्यांना त्यांची बलस्थानं माहित आहेत. गोलंदाजीत तर तो संघ अव्वल स्थानीच आहे, असे कोहलीने सांगितले.

दरम्यान, सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएलमध्ये कमी धावसंख्या असूनही प्रतिस्पर्धी संघाला पराभूत करण्याची मालिका कायम राखली. १४७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु संघाला त्यांनी ५ धावांनी हार मानण्यास भाग पाडले. भुवनेश्वर कुमारने अखेरच्या षटकात यॉर्कर चेंडूचा मारा करताना बेंगळूरूच्या पराभवावर शिक्कामोर्तब केले.