Virat Kohli IPL Final match Performance: विराट कोहली आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचं अनोखं असं नातं आहे. आयपीएलच्या १८ हंगामात कोहली आरसीबी संघासाठी खेळत आहे. १८ पैकी चार हंगामात आजवर आरसीबीचा संघ अंतिम सामन्यात पोहोचलेला आहे. मात्र मागच्या तीन अंतिम सामन्यात आरसीबीला विजय मिळवता आलेला नाही. आजच्या चौथ्या अंतिम सामन्यात विराट कोहली फार मोठी धावसंख्या न उभारता बाद झाला.
चारही अंतिम सामन्यात विराट कोहलीची फलंदाजी कशी राहिली? याबद्दल जाणून घ्या.
विराट कोहलीने यंदाच्या हंगामात ५४.७५ च्या सरासरीने एकूण ६५७ धावा केल्या आहेत. त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील ही तिसरी मोठी धावसंख्या आहे. याआधी २०१६ साली त्याने ९७३ आणि २०२४ साली ७४१ धावा केल्या होत्या. यंदाच्या आयपीएलमध्ये विराट कोहलीने चांगल्या धावा केल्या असल्या तरी त्याला अंतिम सामन्यात मोठी खेळी करता आली नाही. चौथ्या अंतिम सामन्यात विराट कोहलीने १२२.८६ च्या सरासरीने ३५ चेंडूत ४३ धावा केल्या. अंतिम सामन्यात आरसीबीसाठी त्याने सर्वाधिक धावसंख्या उभारली.
आयपीएलच्या दुसऱ्या हंगामात म्हणजेच २००९ साली आरबीसीचा संघ अंतिम सामन्यात पोहोचला होता. त्यावेळी नवख्या विराट कोहलीने ८ चेंडूत ७ धावा केल्या होत्या. या हंगामात हैदराबादच्या डेक्कन चार्जर्सने चषक जिंकला होता.
आरसीबीचा संघ दुसऱ्यांदा २०११ साली अंतिम सामन्यात पोहोचला. यावेळी चेन्नई सुपर किंग्जच्या विरोधात खेळत असताना ३२ चेंडूवर ३५ धावा केल्या होत्या. सीएसकेने अंतिम सामन्यात विजय मिळवला होता.
२०१६ साली आरसीबीचा संघ तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात पोहोचला होता. यावेळी कर्णधार असलेल्या विराट कोहलीने ३५ चेंडूत ५४ धावा ठोकल्या होत्या. विराट कोहलीने या सामन्यात चांगली फलंदाजी केली होती. मात्र तरीही त्यांचा विजय होऊ शकला नाही. सनराइजर्स हैदराबादने २०१६ साली विजय मिळविला.