IPL 2025 Yash Dayal Father Gives Credit to Virat Kohli: आयपीएल २०२५ मध्ये आरसीबीने एकाच सीझनमध्ये दोन वेळा सीएसकेचा पराभव करत मोठा इतिहास घडवला. आरसीबीच्या या विजयाचा हिरो यश दयालदेखील ठरला. ज्याने अखेरच्या षटकात १५ धावांचा बचाव करत संघाला विजय मिळवून दिला. २०२४ मध्येदेखील यश दयालने आरसीबीला चेन्नईवर असाच विजय मिळवून दिला होता. शेवटच्या षटकात ५ षटकार खाल्ल्यानंतर एकेकाळी नैराश्यात गेलेला दयाल आज इतका भेदक गोलंदाजी करू शकतो, तर त्यात विराट कोहलीचं महत्त्वाचं योगदान आहे. हे त्याच्या वडिलांनी स्वतः उघड केले आहे.
यश दयालने ३ मे ला झालेल्या सामन्यात चेन्नईविरूद्ध अखेरच्या षटकात १५ धावांचा बचाव केला. या षटकात त्याने धोनीला झेलबाद केलं. त्यानंतर शिवम दुबेने एक षटकार लगावला आणि नो बॉलही टाकला पण तरीही यश दयालने उत्कृष्ट यॉर्कर टाकत चांगली गोलंदाजी केली.
यश दयालच्या कामगिरीबद्दल त्याच्या वडिलांनी मोठं वक्तव्य केलं आहे. विराट कोहलीमुळेच तो आज मोकळेपणाने खेळत आहे आणि संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असे त्याच्या वडिलांनी सांगितले. त्याचे वडील चंद्रपाल दयाल यांनी खुलासा केला क विराट कोहली आरसीबीमध्ये सामील झाल्यापासून त्याच्याशी खूप चर्चा करतो. तो अनेकदा त्याला त्याच्या खोलीत बोलावतो, बऱ्याच वेळा तो स्वतः यशच्या खोलीत जातो आणि त्याला खेळाबद्दल समजावून सांगत असतो.
यश दयालचे वडिल विराटबद्दल सांगताना म्हणाले, “कठोर मेहनत करत राहा, बिनधास्त खेळ तू, मी तुमच्याबरोबर आहे, काळजी करू नकोस, मेहनत करणं थांबवू नको, चुका कर पण त्यातून शिकवण घे आणि पुढे जा.” यश दयालचे वडील पुढे म्हणाले, “विराटने त्याला खूप स्वातंत्र्य दिलंय आणि त्याला एक निर्भय क्रिकेटपटू बनवलं आहे. मी अनेक क्रिकेटपटूंना तुटून कोसळून जाताना पाहिलं आहे, विशेषतः गोलंदाजांना; पण विराटने त्याला सावरलं आहे.”
२०२३ मध्ये, यश दयाल गुजरात टायटन्सकडून खेळत होता, या शेवटच्या षटकात रिंकू सिंगने त्याच्या गोलंदाजीवर ५ चेंडूत ५ षटकार मारले. यामुळे त्याची खूप थट्टा झाली आणि या संपूर्ण घटनेनंतर तो नैराश्यात गेला. पण आयपीएल २०२४ च्या हंगामात, तो धोनीच्या संघाविरुद्ध १७ धावांचा बचाव करून हिरो बनला. गेल्या दोन वर्षांत त्याने क्रिकेटपटू म्हणून खूप चांगली प्रगती केली आहे. गेले दोन सीझन तो आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळत आहे आणि आरसीबीने त्याच्यावर दाखवलेला विश्वास त्याने सार्थ ठरवला.