Suryakumar Yadav Emotional Speech For His Father: भारतीय टी–२० संघाचा कर्णधार आणि आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाचा विस्फोटक फलंदाज सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२५ स्पर्धेतील प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईचा पुढील सामना गुजरात टायटन्स संघाविरुद्ध होणार आहे. या सामन्यापूर्वी सूर्यकुमार यादवने मुंबईत आपल्या वडिलांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात त्याने वडिलांसाठी भाषण केलं, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सूर्यकुमार यादवने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सूर्यकुमार यादवचं संपूर्ण कुटुंब असल्याचं दिसून येत आहे. या पोस्टला त्याने भावुक करणारं कॅप्शन दिलं आहे. त्याचे वडील अशोक कुमार यादव डीसीएसईएममध्ये कार्यरत होते. दीर्घकाळ सेवा बजावल्यानंतर अलीकडेच ते निवृत्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईत त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला सूर्यकुमार यादवसह संपूर्ण कुटुंबाने हजेरी लावली होती. सूर्यकुमार यादव या कार्यक्रमासाठी येणार असल्याचं माहिती मिळताच, लोकांनी तुफान गर्दी केली होती.

सूर्यकुमार यादवची वडिलांसाठी खास पोस्ट

सूर्यकुमार यादवने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “ माझे पहिले सुपरहिरो, माझे मार्गदर्शक आणि माझ्या आयुष्याची प्रेरणा.. तुमच्या आयुष्याची एक इनिंग पूर्ण झाली आहे. तुम्ही सर्व भूमिका उत्तमरित्या पार पाडल्या. एक सामान्य माणूस, ज्याने आम्हाला असामान्य आयुष्य दिलं. तुम्ही आम्हाला काहीच कमी पडू दिलं नाही. आम्ही अभिमानाने सांगू शकतो, तुमचं यश हे आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. आता वेळ आहे नव्या इनिंगची.”

सूर्यकुमार यादवच्या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल

आपल्या वडिलांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमादरम्यान सूर्याने भाषणही केलं, ज्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. सूर्या भाषण करण्यासाठी येताच, सर्वांनी एकच वादा, सूर्या दादाच्या घोषणा द्यायला सुरूवात केली. यावेळी सूर्यकुमार यादवने आपल्या वडिलांचं अभिनंदन केलं. आपल्या आठवणी सांगितल्या आणि वडीलांना आपल्या दुसऱ्या इनिंगसाठी शुभेच्छा दिल्या. सूर्याच्या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मुंबई भिडणार एलिमिनेटर सामन्यात

मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. मुंबई इंडियन्सचा एलिमिनेटरचा सामना गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी असलेल्या गुजरात टायटन्स संघाविरूद्ध होणार आहे. हा सामना ३० जून रोजी होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.