Yuzvendra Chahal Hat Trick Against KKR: इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल २०२३) च्या १६ व्या हंगामात एकापेक्षा एक रोमांचक सामने खेळले जात आहेत. या रोमांचक सामन्यांमध्ये (११ मे) राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. केकेआरचे होम ग्राऊंड असलेल्या ईडन गार्डन्सवर उभय संघांमधील सामना होणार आहे. त्याचवेळी, या सामन्यापूर्वी राजस्थान रॉयल्सचा स्टार फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने गेल्या वर्षी केकेआरविरुद्ध घेतलेली हॅटट्रिक विकेट आठवली.

स्टार स्पोर्ट्स इंडियाने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये राजस्थान रॉयल्सचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल मुलाखत देताना दिसत आहे. या मुलाखतीत चहलने त्याच्या आयपीएल २०२२ मधील केकेआरविरुद्धच्या हॅटट्रिकची आठवण केली. हॅट्ट्रिकची आठवण करताना चहल म्हणाला, “त्या हॅट्ट्रिकपूर्वी मला दोन षटकांत खूप धावा गेल्या होत्या. मला माहित होते की, मी पुनरागमन करू शकतो.”

चहलने पुढे सांगितले की, “संजूने मला सांगितले की, तुला एका ओव्हरमध्ये १६ ते २० धावा वाचवायच्या आहेत आणि तुला तयार राहावे लागेल. यानंतर संजू मला म्हणाला युजी आता हे सर्व तुझ्यावर अवलंबून आहे. संजूला पाहून माहीभाईची प्रतिमा आठवते. त्यानंतर मी पहिल्याच चेंडूवर व्यंकटेश अय्यरला बाद केले, त्यानंतर मावीची विकेट घेतली. पण जेव्हा कमिन्स मैदानावर आला, तेव्हा मला माहित होते की तो गुगलीची वाट पाहत आहे. त्यावेळी मी हॅट्ट्रिकचा विचार केला नव्हता. हा चेंडू चौकार किंवा चौकारासाठी जाऊ नये, असे मनात चालले होते. त्यामुळे मी वाईड लेगने लेगस्पिन गोलंदाजी केली आणि विकेट मिळवली.”

युजवेंद्र चहल या वर्षीही राजस्थान रॉयल्ससाठी अप्रतिम गोलंदाजी करत आहे. या मोसमात त्याने राजस्थानसाठी आतापर्यंत एकूण ११ सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने १७ विकेट घेतल्या आहेत. एसआरएचविरुद्धच्या मागील सामन्यात त्याने ४ विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे केकेआर विरुद्धच्या सामन्यातही चहल पुन्हा एकदा चेंडूने कहर करताना दिसू शकतो.

हेही वाचा – Rajasthan Royals: संजू सॅमसनची कॉपी करताना दिसला राजस्थान धडाकेबाज फलंदाज, पाहा VIDEO

केकेआर आणि आरआर मधील हेड टू हेड आकडेवारी –

आयपीएलमध्ये आत्तापर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर, केकेआर आणि आरआर यांच्यात २७ सामने झाले आहेत, त्यापैकी केकेआरने १४ आणि राजस्थानने १२ विजय मिळवले आहेत. पावसामुळे एक सामना होऊ शकला नाही. केकेआर आणि आरआर यांचे सध्या समान दहा गुण आहेत.