Yuzvendra Chahal Highest Wicket Taker In IPL: भारतीय लेग-स्पिनर युजवेंद्र चहलने आयपीएल २०२३ च्या ५६ व्या सामन्यात एक मोठी कामगिरी केली. तो कोलकाता नाइट विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला आहे. या स्पर्धेत हा खास विक्रम केल्यानंतर राजस्थान रॉयल्सच्या संघाने ड्रेसिंग रुममध्ये त्याचा खास सन्मान केला, ज्याचा व्हिडिओ फ्रँचायझीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

युजवेंद्र चहलने आयपीएलमध्ये १८३ बळी घेणारा वेस्ट इंडिजचा माजी गोलंदाज ड्वेन ब्राव्होला मागे टाकले. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या सामन्यात चहलने नितीश राणाची विकेट घेताच सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत ब्राव्होला मागे टाकले. चहलने केकेआरविरुद्ध शानदार गोलंदाजी करत चार षटकांच्या स्पेलमध्ये केवळ २५ धावांत चार फलंदाजांची शिकार केली. त्याच्याकडे आता आयपीएलमध्ये १८७ विकेट्स आहेत.

त्याचवेळी, चहलच्या या मोठ्या यशाचे सेलिब्रेशन राजस्थानच्या ड्रेसिंग रूममध्ये एका खास पद्धतीने करण्यात आले. आरआरने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये चहल सोफ्यावर एकटा बसलेला दिसत आहे. इतर सर्व खेळाडू आणि कर्मचारी त्यांच्या सन्मानार्थ टाळ्या वाजवताना दिसतात. या गोष्टीचा व्हिडिओ शेअर करत राजस्थानने कॅप्शनमध्ये लिहिले, ड्रेसिंग रूममधून सुप्रभात जेथे प्रत्येकाला एकमेकांचे यश साजरे करायला आवडते.

उल्लेखनीय म्हणजे, ३२ वर्षीय चहल आयपीएल २०२२ मध्ये राजस्थान रॉयल्सशी संबंधित होता. त्या सत्रात त्याने संघासाठी चमकदार कामगिरी करत २७ विकेट्स घेत पर्पल कॅप जिंकली होती. लेगस्पिनर चहलची जादू चालू हंगामातही कायम आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या १२ सामन्यांमध्ये २१ विकेट घेतल्या असून पर्पल कॅपच्या शर्यतीत तो आघाडीवर आहे.

हेही वाचा – VIDEO: यशस्वी जैस्वालसाठी संजूने सॅमसनने केला अर्धशतकाचा त्याग; शतक हुकल्यानंतरही दिलदारपणा दाखवत मारली मिठी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सामन्याबद्दल बोलायचे, तर या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाने २० षटकांत ८ बाद १४९ धावा केल्या होत्या. त्यामुळे राजस्थानला १५० धावांचे लक्ष्य मिळाले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानने यशस्वी जैस्वाल ९८ आणि संजू सॅमसनच्या ४८ धावांच्या जोरावर १३.१ षटकांत १ गडी गमावून लक्ष्य गाठले.