राजकोट : वेगवान गोलंदाज मुकेश कुमारच्या भेदक माऱ्यानंतर मुंबईकर सर्फराज खानने (१२६ चेंडूंत नाबाद १२५ धावा) केलेल्या शतकी खेळीच्या बळावर शेष भारत संघाने इराणी चषकाच्या सामन्यात सौराष्ट्रविरुद्ध वर्चस्व राखले. सौराष्ट्रचा पहिला डाव २४.५ षटकांत ९८ धावांतच आटोपला. त्यानंतर पहिल्या दिवसअखेरीस शेष भारत संघाची ३ बाद २०५ अशी धावसंख्या होती. त्यामुळे त्यांच्याकडे १०७ धावांची आघाडी होती. सर्फराज खान १२५, तर कर्णधार हनुमा विहारी ६२ धावांवर खेळत होते.

या सामन्यात सौराष्ट्रचा चेतेश्वर पुजारा आणि शेष भारताच्या सलामीच्या फलंदाजांकडे सर्वाच्या नजरा होत्या. पहिल्याच दिवशी या सर्वाना अपयश आले. मुकेश कुमार (४/२३), कुलदीप सेन (३/४१) व उमरान मलिक (३/२५) या वेगवान त्रिकुटाच्या भेदक माऱ्यापुढे यजमान सौराष्ट्राचा डाव २४.५ षटकांतच गडगडला. बंगालच्या मुकेशने दिवसाच्या सुरुवातीला स्विंगचा अप्रतिम वापर केला. पुजाराचा (१ धाव) बळी कुलदीप सेनने मिळविला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेष भारत संघाचीही सलामी अपयशी ठरली. त्यांचे पहिले तीन फलंदाज १८ धावांतच तंबूत परतले. त्यानंतर सर्फराजचा तडाखा व कर्णधार विहारीच्या संयमाने सौराष्ट्राच्या गोलंदाजांना निराश केले. दिवसअखेपर्यंत या जोडीने १८७ धावांची अभेद्य भागीदारी केली. सर्फराजने आपल्या शतकी खेळीत १९ चौकार व दोन षटकार लगावले.