मागील काही दिवसांपासून इराणमध्ये हिजाबविरोधात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची धग आता कतारमध्ये सुरू झालेल्या फुटबॉल विश्वचषकपर्यंत पोहोचली आहे. सोमवारी इराणचा इंग्लंडविरुद्ध फुटबॉल सामना होता. पण इराणच्या खेळाडूंनी मैदानावर उतरल्यानंतर आपल्या देशाचं राष्ट्रगीत गायलं नाही. इराणचं राष्ट्रगीत संपेपर्यंत सर्व खेळाडू भावहीन चेहऱ्याने मैदानावर उभे होते. खेळाडूंच्या या निषेधाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

इराणच्या फुटबॉल संघाचा कर्णधार अलीरेझा जहानबख्श याने सामन्यापूर्वी सांगितले की, इराणमधील सरकारविरोधी आंदोलन करणाऱ्या नागरिकांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रगीत गाण्यास नकार द्यायचा की नाही? हे ठरवण्यासाठी संघाचे सर्व खेळाडू एकत्र येतील. यानंतर इराणच्या फुटबॉल संघाचे सर्व खेळाडू ‘खलिफा इंटरनॅशनल स्टेडियम’मध्ये उतरले. यावेळी आपल्या देशाचं राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर सर्व ११ खेळाडू भावहीन चेहऱ्याने शांतपणे उभे राहिले.

फुटबॉलपटूंच्या या कृत्यामुळे जगभरात इराणविरोधी निदर्शनांची आग आणखी भडकण्याची शक्यता आहे. ही निदर्शने चिरडून टाकण्यासाठी इराणचे इस्लामिक सरकारही मोठ्या प्रमाणात दडपशाहीचा वापर करेन, याबाबतची भीती व्यक्त केली जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेमकं प्रकरण काय?

कुर्द वंशाची २२ वर्षीय तरुणी अमिनी हिजाब परिधान करून रस्त्याने चालत जात होती. पण तिने इराणच्या इस्लामिक नियमांनुसार, हिजाब परिधान केला नव्हता, असा आरोप करण्यात आला आहे. या आरोपावरून इराणच्या इस्लामिक पोलिसांनी अमिनीला अटक केली आणि तिला तीन दिवस तुरुंगात डांबून तिच्यावर अत्याचार केले. दरम्यान, तिची प्रकृती बिघडल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल केलं, पण तेथे तिचा मृत्यू झाला. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर या घटनेचे जगभर पडसाद उमटले आणि इराणी सरकारविरोधात हिजाबविरोधी आंदोलनाला सुरुवात झाली.