Ishan Kishan Batting In County Championship: हेडिंग्लेमध्ये भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये पहिल्या कसोटी सामन्याचा थरार सुरू आहे. दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत सुरू आहे. दुसरीकडे भारताचा यष्टिरक्षक फलंदाज ईशान किशनने इंग्लंडमध्ये नॉटिंघमशायर संघाकडून काउंटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. पदार्पणातच त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला आहे.
काउंटी चॅम्पियनशिप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात ईशानने दमदार अर्धशतकी खेळी केली आहे. त्याने ८७ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने १२ चौकार आणि १ षटकार मारला आहे. त्याचं पहिलं शतक अवघ्या १३ धावांनी हुकलं.
ईशान किशनने नॉटिंघमशायर संघासोबत काउंटी चॅम्पियनशिप स्पर्धेतील २ सामने खेळण्यासाठी करार केला आहे. तो यॉर्कशायर संघासोबत आपला पहिला सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. पहिल्याच सामन्यात त्याने आपल्या तुफान फटकेबाजीने धमाका केला आहे. येत्या २९ जूनला तो समरसेट संघासोबत आपला दुसरा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. दुसऱ्या सामन्यातही त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे.
ईशान किशन आपल्या तुफान फटकेबाजीसाठी ओळखला जातो. या सामन्यात ईशान किशन फलंदाजीला येण्यापूर्वी सलामीला आलेल्या हसीब हमीद आणि बेन स्लेटर यांनी मिळून नॉटिंघमशायर संघाला दमदार सुरूवात करून दिली. या दोन्ही फलंदाजांनी ९० धावांची सलामी दिली. ५२ धावांची खेळी करून हसीब हमीद माघारी परतला. बेन स्लेटर ९६ धावांवर माघारी परतला. त्याचं शतक अवघ्या ४ धावांनी हुकलं. नॉटिंघमशायर संघाने १२२ षटकापर्यंत ८ गडी बाद ४५३ धावा केल्या आहेत.
भारतीय संघात कमबॅक करण्याचा प्रयत्न
ईशान किशन सध्या भारतीय संघातून बाहेर आहे. २०२३ नंतर त्याला भारतीय संघात कमबॅक करता आलेलं नाही. ईशानने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली. त्यानंतर आयपीएल २०२५ स्पर्धेतही त्याने दमदार फलंदाजी केली. सनरायझर्स हैदराबाद संघाकडून फलंदाजी करताना त्याने पहिल्याच सामन्यात शतक झळकावलं होतं. या कामगिरीच्या बळावर त्याने सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट पुन्हा एकदा मिळवला. आता काउंटी चॅम्पियनशिपमध्ये दमदार कामगिरी करून तो भारतीय संघात कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.