इंडियन सुपर लीग (आयएसएल) भारतीय फुटबॉलला एक नवी उंची मिळवून दिली आहे. जवळपास दोन महिने चालणाऱ्या या स्पध्रेमुळे भारतीय खेळाडूंच्या गुणवत्तेला वाव मिळाला, असे मत आयएसएल क्लबच्या प्रशिक्षकांनी व्यक्त केले. ३ ऑक्टोबरपासून आयएसएलच्या दुसऱ्या हंगामाला सुरुवात होत असून यंदाचे हंगाम गतवर्षीच्या तुलनेत अधिक भव्य व आकर्षक असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ब्राझीलचे दिग्गज फुटबॉलपटू आणि एफसी गोवा संघाचे प्रशिक्षक झिको म्हणाले, ‘‘आमच्या क्लबमध्ये चांगले विदेशी खेळाडू आहेत. मात्र भारतीय खेळाडूंना त्यांच्या बरोबरीने खेळ करण्यात अपयश येत आहे. भारतीय खेळाडू शारीरिक तदुंरुस्तीवर भर देत नाही. भारतात गुणवंत खेळाडूंची खाण आहे, परंतु त्यांना योग्य मार्गदर्शनाची व व्यासपीठाची आवश्यकता आहे. आयएसएलमुळे त्यांना ते मिळाले आहे.’’
‘‘दुसऱ्या हंगामाकरिता आम्ही कसून सराव केला आहे. संघाला एकसंघटित करण्याचे आव्हान होते आणि त्यात यशस्वी झालो. आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या कामगिरीला साजेसा खेळ करण्याचे आव्हान भारतीयांसमोर आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या मार्गदर्शनाखाली तीन महिने खेळण्याची संधी त्यांना मिळाली आहे आणि त्यांचा प्रभाव पडण्यासाठी इतका कालावधी पुरेसा आहे. मात्र हे त्या त्या खेळाडूवर अवलंबून आहे. आयएसएलने भारतीय खेळाडूंना व्यासपीठ दिले आहे,’’ असे मत पुणे सिटी क्लबचे प्रशिक्षक डेव्हिड प्लॅट यांनी व्यक्त केले. झिको, प्लॅट यांच्या मताला अँटोनियो लोपेझ हबास (अॅटलेटिको दी कोलकाता), मार्को मॅटेराज्जी (चेन्नईयन एफसी), फ्लोरेंट मॅलोडा (दिल्ली डायनामोज), निकोलस अनेल्का (मुंबई सिटी एफसी), पीटर टेलर (केरला ब्लास्टर) आणि सेसर फॅरीआस (नॉर्थ ईस्ट युनायटेड) यांनी सहमती दर्शवली.
फिफा अध्यक्षपदापेक्षा आयएसएल महत्त्वाचे -झिको
आंतरराष्ट्रीय फुॉटबॉल संघटनेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या ब्राझिलियन दिग्गज झिको यांनी सध्या तरी आपले सर्व लक्ष आयएसएलवर केंद्रित केले आहे. फिफा अध्यक्षपदापेक्षा सध्याच्या घडीला आयएसएल महत्त्वाचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पाच संघटनांनी आपल्याला पाठिंबा दिल्याचे त्यांनी सांगितले. मात्र या संघटनांबाबत अधिक माहिती देणे त्यांनी टाळले.
संग्रहित लेख, दिनांक 27th Sep 2015 रोजी प्रकाशित
आयएसएलमुळे भारतातील गुणवत्तेला वाव
इंडियन सुपर लीग (आयएसएल) भारतीय फुटबॉलला एक नवी उंची मिळवून दिली आहे.
Written by रत्नाकर पवार

First published on: 27-09-2015 at 06:34 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Isl football give chance to players