इंडियन सुपर लीगसारख्या अव्वल दर्जाच्या स्पर्धाचे आयोजन भारताने नियमित केले तर एक दिवस या खेळात विश्वविजेता होण्याचे स्वप्नही ते साकार करतील, असा आत्मविश्वास डच खेळाडू हान्स मुल्डेर यांनी येथे व्यक्त केला.
दिल्ली डायनामोज संघाचे कर्णधारपद अॅलेसांद्रो डेल पिअरो याच्याऐवजी मुल्डेरकडे सोपविण्यात आले आहे. मुल्डेर याने सांगितले, ही लीग स्पर्धा अतिशय यशस्वीरीत्या आयोजित केली आहे. अशा स्पर्धा भारताने यापुढेही आयोजित केल्या तर भारतात अव्वल दर्जाचे खेळाडू तयार होतील. या लीगमुळे फुटबॉलविषयी प्रेक्षकांमध्ये अतिशय सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. या खेळाचा तळागाळापर्यंत प्रसार होण्यास निश्चित मदत होणार आहे.
भारतीय खेळाडूंची या लीगमधील कामगिरी अतिशय उच्च दर्जाची आहे. विशेषत: गेल्या दोन तीन महिन्यांमध्ये भारतीय खेळाडूंचे कौशल्य पाहून मीदेखील आश्चर्यचकित झालो आहे. त्यांची वाटचाल योग्य दिशेने होत आहे व ते आपली प्रगती करण्यासाठी कठोर मेहनत घेत आहेत असेही मुल्डेर म्हणाला.
भारतात २०१७ मध्ये १७ वर्षांखाली गटाची विश्वचषक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. ही स्पर्धा भारतासाठी फुटबॉलविषयक अनुकुल व्यासपीठ ठरणार आहे. त्याचा फायदा येथील संघटकांनी नैपुण्यशोध व विकासाकरिता घेतला पाहिजे असेही मुल्डेर याने सांगितले.
दिल्ली डायनामोज संघाच्या कामगिरीविषयी तो पुढे म्हणाला, या लीगच्या सुरुवातीच्या टप्प्यात आमचे खेळाडू गोल करण्याबाबत कमी पडत होते. गोल करण्याच्या हुकमी संधी मिळूनही आम्हाला त्याचा लाभ घेता आला नव्हता. गेल्या दोन सामन्यांत विजय मिळविताना आमची कामगिरी उंचावली आहे.