Jamie Smith Catch To Dismiss Shubman Gill: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याचा थरार लॉर्ड्सच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंडला ३८७ धावा करता आल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला सुरुवातीला मोठे धक्के बसले. तर केएल राहुलने एक बाजू धरून ठेवली आहे. केएल राहुल दुसऱ्या दिवशी अर्धशतकी खेळी करून नाबाद परतला. तर कर्णधार शुबमन गिलला या डावात मोठी खेळी करता आलेली नाही. त्याला बाद करण्यासाठी जेमी स्मिथने भन्नाट झेल घेतला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
यष्टिरक्षण करणं सोपं काम नसतं. वेगाने येणाऱ्या चेंडूंचा अचूक अंदाज घेऊन चेंडू पकडावा लागतो. जर यष्टिरक्षक वेगवान गोलंदाजाविरूद्ध यष्टिरक्षण करताना यष्टीच्या जवळ उभा असेल तर काम आणखी कठीण होतं. अशात बॅटची कडा घेऊन झेल घेणं सोपं नसतं. गिलला बाद करण्यासाठी यष्टिरक्षक जेमी स्मिथने अविश्वसनीय झेल घेतला.
तर झाले असे की, करुण नायर बाद झाल्यानंतर शुबमन गिल चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने ४४ चेंडू खेळून काढले होते. तो १६ धावांवर फलंदाजी करत होता. त्यावेळी ख्रिस वोक्स ३४ वे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला. या षटकातील पहिलाच चेंडू टप्पा पडून सरळ राहिला. हा चेंडू गिल डिफेन्स करायला गेला. पण चेंडू बॅटची कडा घेत यष्टिरक्षक जेमी स्मिथच्या हातात गेला. स्मिथने कुठलीही चूक न करता झेल घेतला. त्याने घेतलेल्या झेलचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
दुसऱ्या दिवशी काय घडलं?
दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा डाव सुरू झाला त्यावेळी जो रूट ९९ धावांवर नाबाद होता. जो रूटने पहिल्याच चेंडूवर चौकार मारत आपलं शतक पूर्ण केलं. रूटने १०४ धावांची खेळी केली. बेन स्टोक्सने ४४, जेमी स्मिथने ५१, ब्रेंडन कार्सने ५६ धावांची खेळी केली. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ५ गडी बाद केले. भारतीय संघाकडून पहिल्या डावात केएल राहुल ५३ धावांवर नाबाद माघारी परतला. भारतीय संघाला पहिल्या दिवशी ३ गडी बाद १४५ धावा करता आल्या.