भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्याच इनिंगमध्ये दुखापतग्रस्त झाल्यामुळे टीम इंडियाची चिंता वाढली आहे. सामन्यामधलं आपलं सहावं षटक टाकणाऱ्या बुमराहचा पाय पाचवा बॉल टाकल्यानंतर मुरगळला. त्यानंतर त्याला प्रचंड वेदना होत असल्यामुळे त्याला तातडीने मैदानाबाहेर नेण्यात आलं. त्याचा पाय मुरगळला तेव्हाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावरून ही दुखापत गंभीर असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बीसीसीआयनं ट्वीट करून जसप्रीत बुमराहच्या दुखापतीविषयी अधिकृत माहिती दिली आहे.
नेमकं झालं काय?
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये आज तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांची कामगिरी निराशाजनक झाली. अवघ्या ४९ धावांमध्ये भारताचे ७ गडी बाद झाले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीला सुरुवात झाल्यानंतर जसप्रीत बुमराहनंच दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार आणि सलामीवीर डीन एलगरला तंबूत परत धाडलं. त्यामुळे बुमराह हा टीम इंडियासाठी या सामन्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार, असं वाटत असतानाच त्याला दुखापत झाली आणि टीम इंडियाच्या आणि कर्णधार विराट कोहलीच्या चिंता वाढल्या.
नेटिझन्सनी व्यक्त केली चिंता
बुमराह त्याचं सहावं षटक टाकत असताना पाचवा बॉल टाकल्यानंतर त्याचा पाय फॉलोअपमध्ये मुरगळला. त्यानंतर त्याला मैदानाबाहेर नेण्यात आलं. त्याच्याजागी श्रेयस अय्यर बदली खेळाडू म्हणून मैदानात आला. मात्र, डगआऊटमध्ये आपल्या दुखऱ्या पायावर उपचार घेणारा बुमराह प्रचंड वेदनेमध्ये दिसत असल्यामुळे नेटिझन्समध्ये देखील चिंतेचं वातावरण पसरलं आहे. अनेक नेटिझन्सनी ट्वीट करून आपली चिंता व्यक्त केली आहे.
काही नेटिझन्सनी या प्रकारानंतर बुमराह मैदानाबाहेर जातानाचा व्हिडीओ देखील ट्वीट केला आहे.